श्रीचंद तेजवानी सिंधी समाजाचे पहिले महापौर

11 Feb 2026 09:22:40
 
वेध
गिरीश शेरेकर
srichand tejwani भाजपाने गेल्या काही वर्षांत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल इंजिनीयरिंग अतिशय चांगल्या पद्धतीने राबविले आहे. त्याचे यशस्वी परिणाम आपल्याला चौफेर पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगर परिषद, नगर पंचायत, महानगर पालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल असो भाजपा क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीपासून तर भाजपाने देशभरात विविध निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. मजबूत संघटन, अभ्यासपूर्ण नियोजन आणि योग्य सामाजिक समीकरणांची मोट बांधून भाजपा मैदानात उतरते आणि यश मिळविते हा आता सिद्धांत झाला आहे. अर्थात या पाठीमागे निष्ठावान कार्यकर्त्यांचे परिश्रम आहेत. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून भाजपा शिखरावर पोहोचत आहे. विविध ठिकाणचे नगराध्यक्ष असो की महापौरांची निवड करताना भाजपाने सोशल इंजिनीयरिंग साधत कार्यकर्त्यालाच संधी दिली आहे. भाजपाची प्रत्येकच निवड वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून अनेकांना आश्चर्याचे धक्के बसले आहेत. त्यातीलच एक अमरावतीच्या महापौरपदासाठी निवडलेली व्यक्ती आहे. श्रीचंद तेजवानी असे त्यांचे नाव आहे.
 

shrichand tejvani 
 
 
प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळी नावे चर्चेत होती. अशी सगळी नावे दूर सारत भाजपाने श्रीचंद यांना संधी देत सामाजिक समरसतेचा आणखी एक चांगला संदेश दिला आहे. अमरावतीचे नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी हे सिंधी समाजाचे राज्यातले पहिले महापौर आहेत. यापूर्वी उल्हासनगर येथे सिंधी समाजाचे महापौर झाले आहेत. त्या व्यतिरिक्त अन्य कुठेच सिंधी समाजाला आजपर्यंत महापौरपद मिळाले नाही. भाजपाने अमरावतीत श्रीचंद यांना संधी देऊन सिंधी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात सिंधी समाज भाजपाचा परंपरागत मतदार राहिला आहे. तो फक्त महाराष्ट्रापुरताच नाही तर देशभरात भाजपासोबत सातत्याने उभा राहतो. त्यांचे संपूर्ण श्रेय भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना आहे. व्यवहारकुशलता व प्रामाणिकपणाच्या जोरावर सिंधी समाजाने संपूर्ण देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची दखल पदोपदी घेतली जाते. राज्याच्या राजकारणात अगदी बोटावर मोजता येतील, इतकेच सिंधी समाजाचे नेते आहेत. या सर्वांकडून चांगले काम होत आहे. श्रीचंद तेजवानी महापौर झाल्यामुळे सिंधी समाज आनंदी झाला आहे. राज्यासह संपूर्ण देशातल्या सिंधी समजाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एका प्रमुख पदावर आपल्या समाजाची व्यक्ती विराजमान झाल्याचे अप्रूप जवळपास सर्वांनाच आहे. स्वागत समारंभातून ते दिसते आहे. वेगळेपण हे नेहमी अनमोल असते.
 
श्रीचंद यांची राजकीय कारकीर्द भाजपातूनच सुरू झाली. पहिले ते वॉर्ड अध्यक्ष झाले. 2012 मध्ये त्यांना नगरसेवकपदाची निवडणूक महिला आरक्षणामुळे लढता आली नाही. पण, त्यांनी काम सुरूच ठेवले. 2017 महापालिका निवडणुकीत भाजपाने त्यांना संधी दिली आणि ते विजयी झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांना सिंधीबहुल रामपुरी कॅम्प प्रभागातून भाजपाने पुन्हा उमेदवारी दिल्याने त्यांनी विजयाचा झेंडा फडकविला. भाजपाच्या 25 नरसेवकांमध्ये 17 महिला व 8 पुरुष विजयी झाले आहेत. दोन महिला सलग तिसèयांदा तर 12 नगरसेवक दुसèयांदा आणि उर्वरित पहिल्यांदा विजयी झाले आहेत. या सर्वांमधून 57 वर्षीय श्रीचंद यांची निवड महापौरपदासाठी भाजपाच्या नेतृत्वाने केली. ते अमरावती महानगर पालिकेचे 17 वे तर भाजपाचे 7 वे महापौर आहेत. श्रीचंद यांचे शिक्षण जेमतेम जरी असले तरी त्यांच्याकडे उत्तम व्यावसायिक, व्यावहारिक व राजकीय ज्ञान आहे. त्यांच्या मुलाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. अर्थात त्यांनीच ते सुरू केले होते. आता पूर्णवेळ ते राजकारणात आहेत. भाजपाने दिलेल्या संधीचे सोने करण्याचा निर्धार श्रीचंद यांचा आहे. त्यांच्या समाजबांधवांसह शहरातल्या नागरिकांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज आहे. नागरिकांना छोट्याछोट्या कामांसाठी हेलपाटे घ्यावे लागतात. तंत्रज्ञानाचा पूर्ण अभाव दिसतो. जनतेला आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह प्रशासन गतिमान करण्याचे मोठे आव्हान श्रीचंद यांच्यासमोर राहणार आहे.srichand tejwani महापालिकेचे उत्पन्न वाढविणे आणि त्यातून विकासकामे करण्यासाठी एक कृती आरखडा त्यांना तयार करावा लागणार आहे. तेव्हाच श्रीचंद यांची ओळख निर्माण होईल आणि भाजपाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी ठरेल. श्रीचंद यांना खूप शुभेच्छा!
9420721225
Powered By Sangraha 9.0