अग्रलेख
bjps organization कधीकाळी भारतीय जनता पक्षाकडे पाहताना एक ठरावीक समज लोकांच्या मनात ठसविला जायचा. तो असा की, हा पक्ष शहरातला, उच्चभ्रू,‘भटा-ब्राह्मणांचा’ आणि मर्यादित सामाजिक पाया असलेला आहे. ही प्रतिमा राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी मुद्दाम रुजवली होती. सामाजिक कारणांमुळे ती लोकांच्या चर्चेत दीर्घकाळ टिकूनही राहिली. पण गेल्या दोन दशकांत, विशेषतः महाराष्ट्रातील अलिकडच्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील निकालांनी हा समज पुरता निकालात काढला आहे. भाजपा आणि त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला सर्वत्र मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वासह भाजपाच्या संघटनात्मक ताकदीचे अर्थात शेवटच्या थरातील कार्यकर्त्याच्या मेहनतीचे हे यश आहे.
भाजपाचा विजय फक्त महानगरांत नव्हे, तर लहान शहरांत, तालुक्यांत, गावकुसाबाहेरच्या वस्त्यांत आणि ग्रामीण पट्ट्यातही होताना दिसून येतो. भाजपाचा हा विजय संघटनशक्ती, शिस्त, नियोजन आणि अंमलबजावणी यांच्या राजकीयपरिणामकारकतेचा जिवंत पुरावा आहे. राजकारणात विचारसरणी, नेतृत्व, कार्यक्रम यांचे महत्त्व असतेच; परंतु त्यामागे उभे असलेले संघटन हेच प्रत्यक्ष विजयाचे खरे इंजिन असते. संघटन म्हणजे फक्त पदांची उतरंड नव्हे. ती असते पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची शृंखला, जबाबदाऱ्यांची स्पष्ट विभागणी, निर्णयांची वेगवान अंमलबजावणी आणि सतत चालणारी प्रशिक्षण-प्रबोधनाची प्रक्रिया. भाजपाने गेल्या अनेक वर्षांत हेच केले. शाखा, मंडळ, बुथ, शक्तिकेंद्र, जिल्हा, विभाग, प्रदेश अशा बहुस्तरीय रचनेतून कार्यकर्त्यांना सतत कार्यरत ठेवणे फक्त भाजपाला जमते; निवडणूक असो वा नसो, यात खंड पडू दिला जात नाही. दुसरीकडे काँग्रेस किंवा अन्य पक्षांची झोप निवडणूक आली तरच उघडते. एरवी त्या पक्षांचे नेते-कार्यकर्ते आणि संघटना हे सारे झोपलेलेच असतात. भाजपाला निवडणूक आली म्हणून संघटना नव्याने उभी करावी लागत नाही; ती आधीपासून सज्ज असते आणि त्यामुळेच आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी भाजपाला वेळ लागत नाही.
महाराष्ट्राच्या संदर्भात पाहिले तर ग्रामीण भागातले राजकारण प्रामुख्याने घराणेशाही, जातीय समीकरणे आणि काही स्थानिक लोकांचा दबदबा या भोवती फिरत असायचे. जिल्हा परिषदा, नगर पालिका या संस्था अनेकदा मोजक्या लोकांच्या प्रभावाखाली असायच्या. उमेदवारी देताना कार्यकर्त्यांचा दीर्घकालीन कामाचा इतिहास न पाहता, कोण ‘कोणाचा’ आहे हे पाहिले जात असे. परिणामी, पक्षापेक्षा व्यक्ती मोठी आणि संघटना दुय्यम ठरायची. भाजपाने राजकारणाची ही धाटणी मोडली. बुथपातळीवर काम करणाèया कार्यकर्त्यालाही वर येण्याची संधी आहे, ही भावना निर्माण केली गेली. कार्यकर्ता हा केवळ पोस्टर लावणारा किंवा सभा आयोजित करण्यासाठी झटणारा नसून, भविष्यातील नेतृत्व त्याच्या माध्यमातून पुढे येणार आहे, ही धारणा भाजपात रुजविली गेली. यामागे संघटन आणि शिस्तीचा मोठा वाटा आहे. निर्णयप्रक्रियेवर सर्वांचा विश्वास असणे आणि एकदा निर्णय झाला की सर्वांनी एकजुटीने त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे ठरले. भाजपात अंतर्गत चर्चा, मतभेद, विचारविनिमय होतोच; ते स्वाभाविकही आहे. मतदारांना पक्ष एकसंध दिसतो. इतर अनेक पक्षांत याउलट चित्र दिसते. निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी, नाराजी, बंडखोरी, उघड टीका असे सारे घडते. आता ते थोडे फार भाजपातही घडू लागले आहे. त्याकडे भाजपा नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे. इतर पक्षांमध्ये असलेले गटबाजीचे आजार या पक्षाला जडू नयेत, याचीही काळजी घेतली गेली पाहिजे.
पक्षांतर्गत व्यवस्थेत नियोजन आणि अंमलबजावणी या दोन घटकांची सांगड भाजपाने कौशल्याने घातली आहे. निवडणुकीच्या आधी मतदारसंघांचे सूक्ष्म विश्लेषण, सामाजिक रचना, स्थानिक प्रश्न, लाभार्थी वर्ग, मतदारांची प्रवृत्ती या सर्वांचा अभ्यास करून रणनीती आखली जाते. केवळ मोठ्या सभा आणि प्रचारयात्रांवर भर न देता, घराघरांत पोहोचणारे नेटवर्क तयार केले जाते. केंद्र व राज्य सरकारच्या कामांची माहिती, स्थानिक प्रश्नांवर उपाय आणि त्यावरील पक्षाची भूमिका हे सर्व लोकांना सांगितले जाते. यामुळे राजकीय आणि मतदार हे एरवी जाणवणारे अंतर फार कमी होत जाते. भाजपाच्या विस्तारामागे व यशामागे सामाजिक समावेशकतेची भूमिकाही महत्त्वाची आहे. पूर्वी ज्या पक्षावर विशिष्ट समाजघटकाचा ठसा होता, त्याने आज विविध जाती, पंथ, भाषा, व्यवसाय, वयोगटांतील लोकांना नेतृत्वात व पक्ष कार्यात स्थान दिले आहे. नगरसेवकापासून खासदारापर्यंत आणि बुथप्रमुखापासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत विविध पृष्ठभूमीचे कार्यकर्ते दिसतात. ही विविधता केवळ प्रतीकात्मक नाही; ती निर्णयप्रक्रियेतही प्रतिबिंबित होते. पदे देतानाही समावेशकता दिसतेच.
ग्रामीण भागात भाजपाचा वाढता प्रभाव हा इतर पक्षांसाठी विशेष अभ्यासाचा विषय ठरावा. शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योग, स्वयंरोजगार, महिला बचतगट, युवक या सर्व घटकांशी भाजपकडून सातत्याने संवाद ठेवला जातो. केवळ निवडणुकीदरम्यान नव्हे, तर एरवीही शिबिरे, प्रशिक्षण, कार्यक्रम, जनसंपर्क यामधून पक्ष कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या संपर्कात असतो. हे सातत्य विश्वास निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असते. काँग्रेससह इतर अनेक पक्ष अजूनही जुन्याच पद्धतीत अडकलेले दिसतात. घराणेशाही, दरबारी राजकारण, गटबाजी, कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष या गोष्टींमुळे संघटना कमकुवत होते. निर्णय काही मोजक्या लोकांच्या हातात राहतात. कार्यकर्त्याला वाटते की त्याचे श्रम केवळ वरच्या लोकांसाठी आहेत, त्याला स्वतःला पुढे जाण्याची संधी नाही. त्यामुळे त्याची इच्छा आणि ऊर्जा कमी होते. निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये जोश नसतो आणि पक्ष यंत्रणा निष्क्रिय होते. स्वाभाविकच निवडणुकीतील यशावर त्याचा परिणाम होतो.
भाजपाच्या यशाने एक मूलभूत सत्य पुन्हा अधोरेखित केले आहे आणि ते असे की, राजकारणात संघटना हीच खरी ताकद आहे. मोठे नेते, मोठ्या घोषणा, मोठे प्रचारयुद्ध यापेक्षा जास्त प्रभावी असते ते बुथपातळीवरील कार्यकर्त्याचे काम. मतदाराच्या घरात जाऊन संवाद साधणारा, त्याच्या प्रश्नांची नोंद घेणारा, योजनांची माहिती देणारा कार्यकर्ता हा पक्षाचा खरा चेहरा असतो. भाजपाने या चेहऱ्याला सक्षम केले. त्याचा हा परिणाम होय. शिस्त आणि नियोजन यांची सांगड घातल्यास परिणाम कसे मिळतात, हे या निवडणुकांतील यशाने दाखवून दिले. उमेदवारी वाटपापासून प्रचारयोजनेपर्यंत आणि मतमोजणीपर्यंत सर्व प्रक्रिया भाजपात फार शिस्तबद्ध रीतीने पार पडतात.bjps organization नाराजी असली तरी ती संघटनात्मक चौकटीत हाताळली जाते. परिणामी, बाहेर फारसे दिसत नाही. मतदारांनाही असा पक्ष अधिक विश्वासार्ह वाटणे स्वाभाविकच. यातून इतर पक्षांनी शिकण्यासारखे बरेच आहे. संघटन उभे करणे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेणे, शिस्त राखणे आणि नियोजनपूर्वक अंमलबजावणी करणे या गोष्टी कोणत्याही राजकीय पक्षासाठी उपयुक्त आहेत. पण त्यासाठी मानसिकता बदलावी लागते. व्यक्तिकेंद्री राजकारणातून संघटनकेंद्री राजकारणाकडे वळावे लागते.
आज महाराष्ट्रात आणि देशात भाजपाचा विस्तार पाहिला तर तो दीर्घकालीन संघटनप्रक्रियेचा परिणाम आहे हे कुणाच्याही लक्षात यावे. शहरापासून गावापर्यंत, उच्चवर्गापासून सर्वसामान्यांपर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अशा सर्व स्तरांवर पक्षाचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे ‘हा अमुक समाजाचा पक्ष’ ही लेबले आपोआप गळून पडली आहेत. राजकीय यश योगायोगाने मिळत नाही. त्यामागे वर्षानुवर्षांची मेहनत, शिस्त, नियोजन आणि कार्यकर्त्यांचा त्याग असतो. भाजपाने हे देशभरात सर्वत्र आणि वारंवार सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील अलिकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील यश हे याचे ठोस उदाहरण आहे. या यशाने राजकारणातील संघटनशक्तीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
शेवटी, लोकशाहीत मतदार हा सर्वोच्च असतो. तो केवळ नेतृत्वाने, भाषणांनी किंवा घोषणांनी प्रभावित होत नाही; तर त्याला दिसणाऱ्या कामाने, संघटनेच्या उपस्थितीने आणि विश्वासार्हतेने प्रभावित होतो. भाजपाने हे समजून घेतले आणि त्यानुसार काम केले. त्यामुळेच आज तो देशात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपèयात स्वीकारला जात आहे. इतर पक्षांनीही या अनुभवातून धडा घेतला, तर लोकशाही अधिक सुदृढ होईल, संघटनात्मक राजकारणाला नवी दिशा मिळेल आणि राजकीय स्पर्धा अधिक गुणवत्तापूर्ण बनेल.