वर्धेच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात वाढ करून द्या

*राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री भोयर यांची मुख्यमंत्री फडणवीस यांना मागणी

    दिनांक :11-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-district-annual-plan : जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वर्धा जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात वाढ करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
 
 
 
l;
 
 
 
मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचे आराखडे अंतिम करण्यासंदर्भात मुंबई येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच आ. सुमित वानखेडे हे देखील मुंबई येथे बैठकीस उपस्थित होते. त्यावेळी ना. भोयर यांनी ही मागणी केली. वर्धा येथून दुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार आदी उपस्थित होते.
 
 
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला ३५० कोटी रुपये मंजूर होते. यावर्षी यात मोठ्या संख्येने वाढ होणे आवश्यक आहे. वर्धा शहरात नाट्यगृह, बोर अभयारण्याचा विकास, सेवाग्राम विकास आराखड्यासह आरोग्य, शिक्षण, रस्ते यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असल्याने वार्षिक योजनेच्या आराखड्यात वाढ करून देण्याची विनंती पालकमंत्र्यांनी भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
 
 
राज्य शासनाच्या वतीने ‘मित्रा’ ही स्वतंत्र संस्था विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करीत आहे. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणकुमार परदेशी हे अभयारण्याचे जाणकार आहे. त्यामुळे बोरच्या विकासाची जबाबदारी मित्रा या संस्थेकडे देण्यात यावी, असी विनंती देखील पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केली.
 
 
जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी शासनाने सुचविलेला नियतव्यय आणि विभागांकडून प्राप्त झालेल्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पुढील आर्थिक वर्षाच्या आराखड्याचे सादरीकरण केले.
 
 
सेवाग्राम सोलर पार्कला मंजुरी द्या
 
 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखड्याद्वारे सेवाग्राम व वर्धा येथे विविध विकासाची कामे करण्यात आली. अजून काही नावीन्यपूर्ण कामे प्रस्तावित आहे. ती कामे व त्यासाठी लागणार्‍या निधीस मंजुरी मिळावी तसेच सेवाग्राम येथे ‘सेवाग्राम विकास पार्क’ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यास देखील मान्यता मिळावी, अशी मागणी देखील केली.
 
 
विकास आराखडा ४५० कोटींचा करावा : आ. वानखेडे
 
 
जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा वाढवून देण्यात यावा या मागणीला आ. सुमित वानखेडे यांनी देखील लावून धरले. यावर्षी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ३५० कोटी रुपये मंजूर आहे. पुढील आर्थिक वर्षात ४५० कोटीचा आराखडा करण्यात यावा. शाळा, रुग्णालयं, अंगणवाड्यांना दरवर्षी निधी दिला जातो. परंतु, हा निधी पुरेसा नाही. नियोजन करून या बाबींचा विषय एकदात मार्गी लावणे आवश्यक असल्याचे आ. वानखेडे म्हणाले.