‘तेल गेले, तूप गेले अन् ...!

12 Feb 2026 06:00:00
अग्रलेख...
chandrapur congress party एक जुनी गोष्ट आहे. आईने सांगितल्याप्रमाणे मुलगा तेल आणि तूप घ्यायला बाजारात गेला होता. या वस्तू आणण्यासाठी त्याने धुपाटणे सोबत घेतले. हे एक उभे पात्र असते, ज्यात दोन्ही बाजूला जागा असते. त्याने दुकानदाराकडून वरच्या भागात तेल घेतले. दुकानदार म्हणाला, तूप कुठे देऊ. तर त्या मुलाने पात्र उलटे केले आणि त्यात तूप घेतले आणि परत फिरला. रस्त्यात त्याला आठवले की, तेल सुरक्षित आहे की नाही बघितले पाहिजे आणि म्हणून त्याने पात्र पुन्हा उलटे केले. त्या क्षणी तूपही गेले होते. शेवटी ‘तेल गेले, तूप गेले अन् हाती केवळ धुपाटणे राहिले’, अशी त्याची स्थिती झाली.
 
 

चंद्रपूर महानगर  
 
 
ही बोधकथा आठवण्याचे कारण म्हणजे, चंद्रपूर महानगराच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तोंडापर्यंत आलेला सत्तेचा घास या पक्षाचे नेते खा. प्रतिभा धानोरकर व आ. विजय वडेट्टीवार यांच्यातील कमालीच्या भांडणाने आणि पराकोटीच्या अहंकारामुळे हिरावला गेला. 27 नगरसेवकांच्या बळावर सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या काँग्रेसला मित्रपक्ष असलेल्या जनविकास सेनेच्या 3 नगरसेवकांचे बळ आधीच मिळाले होते. जनविकास सेनेने ‘एआयएमआयएम’च्या एका नगरसेवकाला आपल्या गटात घेतल्याने तोही काँग्रेसचा नैसर्गिक मित्र होता. अशा एकूण 31 सदस्यांच्या ताकदीवर काँग्रेस पक्ष अगदी सहजतेने सत्ता काबीज करू शकला असता. बहुमत सिद्ध करायला अवघ्या 3 सदस्यांची गरज होती. त्यातही निवडून आलेले दोन अपक्ष सदस्य हे काँग्रेसचेच बंडखोर होते. आ. वडेट्टीवार यांची जवळीक असलेल्या या दोघांचीही ‘घरवापसी’ अशक्य नव्हती. शिवाय, शिवसेना उबाठा पक्ष तडजोडीसाठी तयार होताच. पण अहंकार आडवा आला.
 
‘तेल गेले, तूप गेले’, ही म्हण या काँग्रेसच्या नेत्यांना किती चपखल लागू पडते, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. त्यांच्या वादामुळे ज्या पक्षाकडे जनतेने सर्वाधिक नगरसेवक देऊन सत्तेचा कौल दिला होता, त्या पक्षाला सत्तेचे एकही पद मिळाले नाही! महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चंद्रपूरच्या या निकालाची चर्चा चवीने केली जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे. राज्यातील अन्य महापालिकांमध्ये स्थानिक समीकरणांवरून लढती होत असल्या, तरी चंद्रपूरने अनिश्चिततेचा नवा विक्रम नोंदवला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे होते. कारण हा निकाल केवळ एका महानगराचा नव्हता, तर तो राजकीय परिपक्वतेची कसोटी पाहणारा होता आणि त्यात काँग्रेसचे नेते अपयशी ठरले. 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्तेबाहेर राहणे, हे खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत कलहाचेच फळ आहे. ज्याची सत्ता, त्याची तलवार हे राजकारणाचे सूत्र आहे. पण, इथे तर तलवार हातात असतानाही केवळ एकमेकांना कापण्याच्या नादात काँग्रेस नेत्यांनी स्वतःचेच ‘हात’ कापून घेतले. मित्रपक्षांना सोबत घेऊन चालण्याची प्रगल्भता दाखवण्याऐवजी, ते तर आमच्या दावणीलाच बांधले आहेत, हा अहंकार त्यांना नडला. उलट, भारतीय जनता पक्षाने बहुमतापासून खूप दूर असताना आणि तब्बल 10 नगरसेवकांची गरज असताना, अगदी शेवटपर्यंत अत्यंत सजग राहून सत्ताकारणाचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. विजयाचा जल्लोष साजरा होत असताना कार्यकर्त्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार हे ‘किंगमेकर’ असल्याचे फलक मिरवले, यातच सारे काही आले. त्यांच्यासारख्या चाणाक्ष आणि मुत्सद्दी नेत्याच्या मार्गदर्शनाखाली भाजपने कमी संख्या असतानाही बाजी मारली. निवडणुकीदरम्यान अतिशय संयमी, पण आत्मविश्वासाने भरलेल्या मुनगंटीवारांच्या वक्तव्याची जराशी दखल जरी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली असती, तरी त्यांच्यावर नामुष्कीची पाळी आली नसती. भाजप आणि उबाठा यांच्यातील अनपेक्षित युती हा केवळ योगायोग नव्हता. ती सुनियोजित रणनीती होती. त्याची इतिश्री मंगळवारी मतदानाला येताना अगदी रस्त्यात गाड्या उभ्या करून अंतिम तडजोडीने झाली. काँग्रेस मात्र गाफील राहिली.
 
चंद्रपूरच्या निवडणुकीने राजकारणातील अनिश्चिततेचा आगळा थरार अनुभवला. अवघ्या एका मताने भाजपच्या संगीता खांडेकर यांचा विजय राजकारणात शेवटच्या मिनिटापर्यंत लढणे कसे महत्त्वाचे असते, हे सांगणारे होते. तर, उपमहापौरपदाचा सामना जेव्हा बरोबरीत सुटला आणि ‘ईश्वरचिठी’ने उबाठाचे प्रशांत दानव यांची वर्णी लागली, तेव्हा नशीबही फक्त खऱ्या योद्ध्याला साथ देते हे अधोरेखित झाले. ‘जो जिता वो सिकंदर’ हे राजकारणाचे अंतिम सत्य आहे, हे समजून घेतले पाहिजे. काँग्रेसने जनतेचा कौल मिळवला, पण ते सत्ता स्थापन करू शकले नाहीत. भाजपने रणनीती आखली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. या सगळ्या नाट्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की, केवळ संख्याबळ असणे पुरेसे नसते, तर ते सांभाळण्यासाठी आणि योग्य वेळी वापरण्यासाठी मुनगंटीवार यांच्यासारख्या चाणाक्ष पुढाऱ्याचीच गरज लागते. काँग्रेससाठी आता पश्चात्ताप करण्यापलीकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.
 
चंद्रपूरप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर महानगरांमध्येही भाजपने आपली सजगता दाखवून दिली आहे. तब्बल 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता मोडीत काढत भाजपने मुंबईवर भगवा फडकवला. तिथे रितू तावडे यांना महापौरपदी बसवून इतिहास रचला गेला. मुंबईसारखे महत्त्वाचे शहर ताब्यात घेण्यासाठी या पक्षाने दाखवलेली संघटनात्मक ताकद वाखाणण्याजोगी आहे. पुणे आणि नागपूरमध्ये तर आधीच भाजपने आपले बालेकिल्ले मजबूत केले आहेत. पुण्यातील पवारांच्या वर्चस्वाला धक्का देत आपली पकड घट्ट केली, हे त्या पक्षाच्या सातत्यपूर्ण कर्माचे फळ आहे. ध्येयनिष्ठ विकास घडवून आणण्यासाठी नाही म्हटले तरी सत्तेची गरज असते. ती मिळवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते आणि ते भाजप करताना दिसते. उलट, काँग्रेस सततच्या पराभवानंतरही ही गोष्ट आत्मसात करायला तयार नाही. विकासाच्या ध्येयपथावर सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. उलट, चंद्रपूर महानगराच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी अन्य मित्रपक्षांचा अजिबात विचारच केला नाही. आपसात भांडून खा. धानोरकर व आ. वडेट्टीवार यांनी महापौर व उपमहापौरपद आपसात वाटून घेतले आणि उबाठा, जनविकास सेना यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद तेवढे देण्याची तयारी दाखवली. उबाठा त्यावर ऐकणार नाही, हे सर्वांना कळत होते. ते काँग्रेस नेत्यांना का उमजले नाही, हे मात्र न समजण्यापलीकडचे आहे. खरे तर, सर्वांत मोठी अडचण खा. धानोरकर व आ. वडेट्टीवार यांच्यातील तीव्र स्पर्धेत दडलेली आहे. ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’, असा राग आलापणाऱ्या धानोरकर यांना, वडेट्टीवार कधीच सहन झाले नाहीत. त्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नाक खुपसू नये, अशीच त्यांची आधीपासून इच्छा होती आणि त्यामुळे अगदी निवडणुकीच्या प्रचारापासूनच या दोन्ही काँग्रेसी नेत्यांमध्ये गृहयुद्ध सुरू राहिले. तरीही जनतेने काँग्रेसला 27 नगरसेवक दिले. वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाचे कधी मानलेच नाही, तर ‘हा माझा, हा तुझा’ असेच त्यांचे नामाभिधान करून त्यांना विभाजित केले. कमी पडले तर एकमेकांचेच नगरसेवक पळवले; जसे विरोधक पळवतात तसे! आपापल्या गटाची वेगळी नोंदणी करण्याचे कारस्थानही केले गेले. उघड्या डोळ्यांनी पक्षश्रेष्ठी हे सारे बघत राहिले. आपल्या आटोक्यातले हे नाही, याची खात्री प्रदेशाध्यक्षांना पटली तेव्हा हा वाद दिल्ली दरबारी पोहोचला. दिल्लीच्या तहाप्रमाणे, महापौरपद धानोरकर गटाकडे, तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे देण्याचे ठरले. या तडजोडीमुळे आनंदात असलेल्या या नेत्यांना याची जाणीवच झाली नाही, की दोन्ही पदे जर तुमच्याकडेच राहणार असतील, तर मित्रपक्षाचे काय? उबाठा पक्ष जणू आपल्या दावणीलाच बांधला आहे, असे समजून त्यांनी त्यांच्या 6 नगरसेवकांना गृहीत धरले. आधीचा मित्रपक्ष असलेल्या जनविकास सेनेला तर विश्वासातच घेतले नाही. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी आपला अहंकारही त्यांनी दूर सारला नाही. शेवटी सारेच तुटले.
 
अगदी दगडाला जरी काँग्रेस पक्षाचा उमेदवार केला तरी तो सहज निवडून येईल, असा चंद्रपूर जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसचा दबदबा होता. 2019 च्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी अवघ्या महाराष्ट्रात एकमेव अशी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची जागा राखत विक्रम नोंदवला होता. खा. प्रतिभा धानोरकर या त्यांच्याच अर्धांगिनी आहेत. पण त्यांच्या आणि राज्यात काँग्रेसचा मातब्बर नेता म्हणून ओळख असलेल्या आ. विजय वडेट्टीवार यांच्या हट्टापायी पक्षाच्या त्या पुण्याईची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार चंद्रपुरात घडला. या पक्षाचे सर्वांत मोठे दुर्दैव कोणते असेल, तर अशा मोठ्या नेत्यांना आवरण्याची धमक पक्षश्रेष्ठींमध्ये उरलेली नाही. काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस कसा रसातळाला जात आहे, याचे ताजे उदाहरण चंद्रपूर आहे, हे वास्तव हा पक्ष जेवढ्या लवकर मान्य करेल, तेवढे काँग्रेससाठी बरे. बाकी राजकारण आपल्या पद्धतीने होतच राहणार!
Powered By Sangraha 9.0