वेध...
market risk मार्च महिना जवळ आला की देशभरात गुंतवणुकीचा महोत्सव सुरू होतो. टेलिव्हिजन, मोबाईल, वृत्तपत्र, सोशल मीडिया-सर्वत्र शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन यांच्या जाहिरातींचा पूर येतो. आता गुंतवा भविष्यात सुरक्षित व्हा, डबल रिटर्न, टॅक्समध्ये मोठी सूट अशा आकर्षक शब्दांत सर्वसामान्य माणसाला स्वप्नं दाखवली जातात. मार्च अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होतेही. मात्र प्रश्न असा आहे की, ही गुंतवणूक करताना सामान्य माणसाला त्या योजनेची खरी माहिती असते का?
बहुतेक वेळा उत्तर नकारार्थीच असते. किती रिटर्न मिळणार, त्यावर किती टॅक्स लागणार, तो रिटर्न हमखास आहे की बाजारावर अवलंबून आहे, तोटा झाला तर जबाबदारी कुणाची, या मूलभूत प्रश्नांची उत्तरे न समजूनच अनेक जण आपली आयुष्यभराची जमापुंजी गुंतवतात. काही महिन्यांनी बाजार घसरतो, युनिट्सची किंमत कमी होते आणि मग डोक्यावर हात मारून बसायची वेळ येते.
या सगळ्या जाहिरातींच्या शेवटी एक वाक्य हमखास असतं- ‘सब्जेक्ट टु मार्केट रिस्क.’ हे वाक्य इतक्या झपाट्याने, इतक्या छोट्या अक्षरांत वाचून दाखवलं जातं की सामान्य माणसाला त्याचा अर्थ कळण्याआधीच जाहिरात संपते. मोठे अभिनेते, क्रिकेटपटू, सेलिब्रिटी हे प्रॉडक्ट्स प्रमोट करतात, त्यामुळे लोकांचा विश्वास आणखी वाढतो. सचिन सांगतोय म्हणजे बरोबरच असेल, धोनीने केलंय म्हणजे सुरक्षितच असेल, असा समज तयार होतो. मात्र अलिकडेच काही नामवंत क्रिकेटपटूंना सेबी व आयआरडीएने नोटीस दिल्याच्या बातम्या समोर आल्या. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते जाहिरात करणारी सेलिब्रिटी जबाबदार नसते, जबाबदारी शेवटी गुंतवणूकदाराचीच असते. मग प्रश्न उरतो, ‘सब्जेक्ट टु मार्केट रिस्क’ म्हणजे नेमकं काय? याचा साधा अर्थ असा की, या गुंतवणुकीवरचा नफा किंवा तोटा पूर्णपणे बाजारावर अवलंबून आहे. इथे हमी नाही, खात्री नाही, निश्चित रिटर्न नाही. बाजार वाढला तर फायदा, घसरला तर नुकसान- इतकंच सरळ गणित आहे. पण ही गोष्ट सर्वसामान्य माणसाला किती जण समजावून सांगतात? म्हणूनच गुंतवणूक करताना काही खबरदारी अत्यावश्यक आहे.
कोणतीही योजना घेताना फक्त जाहिरात पाहून निर्णय घेऊ नका. योजनेची कागदपत्रे नीट वाचा, टॅक्सचे नियम समजून घ्या, तुमची जोखीम घेण्याची क्षमता तपासा. हमी आणि अंदाज यातला फरक ओळखा. शक्य असेल तर स्वतंत्र, विश्वासार्ह आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या- सेल्समनचा नाही. गुंतवणूक चुकीची नाही, पण अज्ञानातून केलेली गुंतवणूक धोकादायक आहे. ‘सब्जेक्ट टु मार्केट रिस्क‘ हे फक्त वाक्य नाही, ती एक स्पष्ट सूचना आहे, पण ती समजून घेण्याची जबाबदारी आपली आहे. अन्यथा मार्चमध्ये गुंतवणूक आणि एप्रिलमध्ये पश्चात्ताप, हेच सर्वसामान्य माणसाचं नशीब बनून राहील. गुंतवणूक चुकीची नाही, पण अज्ञानातून केलेली गुंतवणूक धोकादायक आहे. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, युलिप, हायब्रिड प्लॅन सर्व काही भविष्यासाठी सर्वोत्तम म्हणून मांडलं जातं. पण या झगमगाटामागे एक प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो की या सगळ्यांच नियमन नेमकं कोण आणि किती प्रभावी? सेबी, आयआरडीए, अर्थ मंत्रालय हे सगळे रेग्युलेटर फक्तनियम बनवण्यासाठी आहेत की सर्वसामान्य गुंतवणूकदाराचं संरक्षण करण्यासाठी? जाहिरातीच्या शेवटी वेगात वाचलं जाणारं सब्जेक्ट टु मार्केट रिस्क एवढीच काय ती त्यांची जबाबदारी उरली आहे का? सामान्य माणसाला हे वाक्य समजत नसेल, तर तो दोष कुणाचा, गुंतवणूकदाराचा की यंत्रणेचा? आज बाजाराधिष्ठित उत्पादनांची जाहिरात करताना मोठमोठे सेलिब्रिटी पुढे येतात. पण बाजार कोसळला, रिटर्न शून्य झाला, गुंतवणूक अर्धी बुडाली की कोणीही पुढे येत नाही. तेव्हा रेग्युलेटर फक्त तुम्ही धोका स्वीकारला होता असं सांगून मोकळे होतात. मग प्रश्न उभा राहतो की सर्व धोका सामान्य माणसाचाच आणि नफा सगळ्यांचाच का? रेग्युलेटर बाजाराला मोकळं रान देतात, पण सरकारी संस्थांवर नियमांची कात्री लावतात, हा विरोधाभासही विचार करण्यासारखा आहे. एलआयसीसारख्या संस्थांवर हमीची जबाबदारी, पारदर्शकता, सामाजिक बांधिलकी सगळं बंधनकारक. पण खाजगी, बाजाराधिष्ठित उत्पादनांमध्ये नुकसान झालं की मार्केट रिस्क नावाची ढाल पुढे केली जाते. आज गरज आहे ती गुंतवणूकदार शिक्षणाच्या जाहिरातींची, स्पष्ट भाषेत जोखीम समजावून सांगण्याची आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर कठोर कारवाईची. रेग्युलेटरने फक्त नोटीस पाठवण्यापुरतं न थांबता, सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण हे आपलं मुख्य उद्दिष्ट मानलं पाहिजे.
नंदकिशोर काथवटे-9922999588