न्यूयॉर्क,
JPMorgan Chase office mandate, कोरोनानंतर जगभरात वेगाने रुजलेले ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘हायब्रीड’ कामकाज मॉडेल आता माघारी जाण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेतील सर्वात मोठी बँक जेपीमॉर्गन चेसमध्ये सध्या व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात कार्यालयीन उपस्थितीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डायमन यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाचही दिवस कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्यानंतर या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी याचिका आणि युनियन स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मार्चपासून लागू झालेल्या नव्या नियमामुळे आतापर्यंत घरून काम करणाऱ्या सुमारे ३० टक्के कर्मचाऱ्यांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली असून, ३ लाखांहून अधिक कर्मचारी असलेल्या या बँकेत आतापर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांनी ‘कम्युनिकेशन्स वर्कर्स ऑफ अमेरिका’ या संघटनेशी संपर्क साधून ‘लेबर युनियन’ स्थापन करण्याबाबत सल्लामसलत सुरू केली आहे. अमेरिकेच्या वित्त क्षेत्रात अशा प्रकारची संघटनात्मक चळवळ अत्यंत दुर्मिळ मानली जाते.
याचिकेवर नाव नोंदवणे म्हणजे ‘करिअर सुसाईड’ ठरू शकते, अशी भीती एका कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या टीम्स वेगवेगळ्या खंडांमध्ये आणि विविध टाइम झोनमध्ये विभागलेल्या आहेत. “माझी टीम दोन खंड आणि तीन वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये काम करते. मग सर्वांनी एकाच ऑफिसमध्ये बसणे का बंधनकारक असावे?” असा सवाल एका कर्मचाऱ्याने उपस्थित केला आहे. जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपनीत घरून काम करणेही कार्यालयीन कामाइतकेच प्रभावी ठरू शकते, असा कर्मचाऱ्यांचा युक्तिवाद आहे.
दरम्यान, टाउन हॉल बैठकीत बोलताना सीईओ जेमी डायमन यांनी या याचिकेची दखल घेण्यास स्पष्ट नकार दिला. “कंपनीत काम करायचे असल्यास उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांना दोन पर्याय असल्याचे स्पष्ट केले. “कंपनीमध्ये राहायचे की नाही, हा वैयक्तिक निर्णय आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दर्शवले.
डायमन यांच्या मते, विशेषतः युवा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, व्यवस्थापनाशी संवाद आणि नव्या कल्पनांची देवाणघेवाण यासाठी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. जरी सुमारे १० टक्के नोकऱ्या पूर्णपणे रिमोट पद्धतीने सुरू राहतील, तरी बहुसंख्य कर्मचाऱ्यांसाठी ‘फेस-टू-फेस’ संवाद अत्यावश्यक असल्याचा त्यांचा दावा आहे.
या पार्श्वभूमीवर, ‘वर्क फ्रॉम होम’च्या भवितव्याबाबत जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात नव्याने चर्चा सुरू झाली असून, कर्मचारी-व्यवस्थापन संबंधांचा नवा अध्याय लिहिला जात आहे.