* भाजी विक्रेत्या महिलांच्या अडणींवर काढला तोडगा
* आ. मुनगंटीवार यांनी दिले होते निर्देश
चंद्रपूर,
Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप-सेना-उबाठा युतीने सत्ता स्थापन केली. संगीता खांडेकर व उपमहापौर प्रशांत दानव यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला आणि लगेच राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशाप्रमाणे, पहिल्याच दिवशी ‘अॅक्शन मोड’वर आले. त्यांनी येथील गोलबाजारातल्या भाजी विक्रेत्या महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढला. या संवेदनशील व तत्पर भूमिकेमुळे भाजी विक्रेत्या महिलांची प्रसाधनगृहाची समस्या सोडविण्यासंदर्भात ठोस पाऊल उचलले गेले. मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनेनंतर, चंद्रपूरच्या नवनियुक्त महापौर व उपमहापौरांनी गोलबाजाराला भेट दिली. त्यासाठी भाजी विक्रेत्या महिला तसेच स्थानिक नागरिकांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
Chandrapur Municipal Corporation गोलबाजार परिसरात महिला मोठ्या संख्येने भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, तिकडे आजवर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः प्रसाधनगृहाच्या सुविधेअभावी महिलांची गैरसोय होत होती. या समस्येबाबत अनेक महिलांनी मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. त्याची दखल घेत मुनगंटीवार यांनी, खांडेकर आणि दानव यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवार, 13 फेब्रुवारीला दोघांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकार्यांना तात्काळ सुसज्ज प्रसाधनगृह उभारण्याचे निर्देश दिले. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करून महिलांना दिलासा देण्यावर भर देण्यात आला. या सकारात्मक निर्णयामुळे भाजी विक्रेत्या महिलांमध्ये समाधानाची भावना आहे. त्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार, महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांचे आभार मानले.