प्रकरण बाळ विक्रीचे!

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
उच्च न्यायालयातून आरोपीने अटकपूर्व जमीनाचा अर्ज घेतला मागे
डॉ. बाजपेयीच्या रुग्णालयाची मान्यता होणार रद्द?
जन्म दाखल्यानंतर दिली जाणार होती उर्वरित रक्कम!

भंडारा: Baby selling case  दहा दिवसाच्या मुलीच्या विक्री प्रकरणात आता नवनवीन खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. या प्रकरणात आता मुख्य आरोपी असलेल्या डॉ. नितेश बाजपेयी रुग्णालयाची नोंदणी रद्द केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिव्याखाली अंधार असताना याच डॉक्टराने गोंदियाच्या एका जिल्हाशल्यचिकित्सकांच्या विरोधात कधीकाळी अवैध गर्भपात केंद्राला परवानगी आणि इतर विषयांना घेऊन रान उठवले होते. दरम्यान आरोपी डॉक्टर बाजपेयी अटकपूर्व जामिनासाठी धडपडत आहे. दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनार सुनावणी बाकी असल्याने, आज 13 रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारल्या नंतर आरोपीने अर्ज मागे घेतला आहे.
 
 
balaji
 
Baby selling case गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटल अँड सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ. नितेश बाजपेयी यांचे प्रकरण उघडकीस 10 दिवसाच्या मुलीच्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता आणखी काही गोष्टी पुढे येताना दिसत आहेत. या प्रकरणातील बाळ विकत घेणाऱ्या महिलेने बाळ दत्तक घेण्याच्या दृष्टीने महिला व बालकल्याण कार्यालयाकडे विचारपूस करून माहिती गोळा केली. मात्र ही प्रक्रिया नियमानुसार होणारी असल्याने कदाचित बाळ विकत घेण्याचा हा चुकीचा मार्ग तीने स्वीकारला असावा. या प्रकरणातील अटक असलेल्या महिलेच्या गुगल पे क्रमांकावर विकत घेणाऱ्या महिलेने 98 हजार वळते केले. 1 लाखाची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली, तर उर्वरित 1 लाख रुपये ज्या दिवशी हे प्रकरण उघडकीस आले, त्या दिवशी जन्माचा दाखला तयार झाल्यानंतर दिले जाणार होते, अशी विश्वसनीय माहिती आहे.
 
 
Baby selling case मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टर बाजपेयी यांच्या विरोधात गोरेगाव विनापरवानगी दवाखाना सुरु केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचीही माहिती आहे. त्याच्या असलेल्या पदव्यांविषयीही शंकाचउपस्थित केली जात आहे. दरम्यान स्वतः एवढा मोठा पराक्रम करणाऱ्या डॉ. बाजपेयी याने गोंदियाचे यापूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक मोहबे यांच्याविरुद्ध आंदोलन करून रान उठवले होते. मृत व्यक्तींना फिटनेस प्रमाणपत्र, अवैध गर्भपात आणि अवैध नर्सिंग होमला परवानगी दिल्याचा आरोप करून कारवाईची मागणी करण्यात आली होती. आज त्यामागचे कारण उघड होत आहे, असे म्हणता येऊ शकते. न्यू बालाजी हॉस्पिटल अँड सोनोग्राफी सेंटर चे धागेदोरे गोंदियातील एका शासकीय रुग्णालयापर्यंत गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस तपासात या सर्व बाबी उघड होतील, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. दरम्यान या अनुषंगाने गोंदियाचे जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम पटले यांच्याशी संपर्क केला असता डॉ. बाजपेयी यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने रुग्णालयाची नोंदणी तात्पुरती रद्द केली जाईल असे ते म्हणाले. त्यांच्या पदवी संदर्भातही संभ्रम असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
 
 

शोध सुरु: विसापूरे प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टरचा शोध सुरू आहे. जिल्हा न्यायालयात जमीनासाठी अर्ज केला होता. मात्र ही सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी आहे. दरम्यान आरोपीने आज उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु जिल्हा न्यायालयात सुनावणी बाकी असल्याने न्यायालयाने आरोपीला फटकारले व यावर जिल्हा न्यायालयातच सुनावणी होईल असे सांगितल्यानंतर आरोपीने अर्ज मागे घेतला आहे. आरोपीच्या वैद्यकीय डिग्री आणि नोंदणी संदर्भात जिल्हा शल्यचिकेचा गोंदिया यांना पत्र पाठवून माहिती मागविण्यात आली असल्याचे प्रकरणाचे तपास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांनी सांगितले.