मालेगाव,
Malegaon Deputy Mayor, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या कार्यालयात लागलेला टिपू सुलतान यांचा फोटो सामाजिक वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या फोटो आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्वरित कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शिवसेनेच्या नगरसेवकांनी या फोटोविरोधात निषेध नोंदवला असून महानगर पालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात भेट देऊन फोटो काढण्याची मागणी केली.
शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार सांगितले की, "जोपर्यंत फोटो काढला जात नाही तोपर्यंत आम्ही निदर्शन करत राहू आणि हे निदर्शन पुढे आंदोलनात परिवर्तित होईल." या घटनेवर उपमहापौर शान ए हिंद यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, टिपू सुलतान हे ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे फ्रीडम फायटर होते. भाजपचे एक खासदार देखील मान्य करतात की त्यांनी इंग्रजांविरुद्ध महत्त्वाचा लढा दिला, तर महाराष्ट्र सरकारनेही एका गॅझेटमध्ये त्यांच्या जयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. उपमहापौरांनी विरोध करणाऱ्यांना "कोण विरोध करतो?" असा सवाल करत आपल्या भूमिका स्पष्ट केल्या.दरम्यान, मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड झाली आहे. नसरीन बानो शेख यांनी ४३ मतांची बाजी मारली, तर विरोधातील शिवसेनेच्या उमेदवार लता घोडके यांना १८ मतं मिळाली. इस्लामच्या ३५, समाजवादी पक्षाच्या ५ आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी नसरीन बानो यांना मतदान केले.उपमहापौरपदी समाजवादी पक्षाच्या शान ए हिंद विजयी झाल्या असून, त्यांना ४३ मतं मिळाली. या निवडणुकीनंतर मालेगाव महानगरपालिकेतील राजकीय संतुलन स्पष्ट झाले असून, आगामी काळात या वादग्रस्त फोटो प्रकरणावर काय कारवाई होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.