मुंबई,
Mumbai–Prayagraj special train, उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून, लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि प्रयागराज दरम्यान ४४ साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष ट्रेन सेवांमुळे होळी आणि उन्हाळी हंगामातील अतिरिक्त प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान प्रत्येकी २२ सेवा दोन्ही दिशांनी असतील. मुंबईतून प्रयागराजकडे जाणारी ट्रेन क्रमांक ०४१०२ ही साप्ताहिक विशेष गाडी १७ फेब्रुवारी २०२६ ते १४ जुलै २०२६ दरम्यान दर मंगळवारी सायं १६:५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायं १७:०० वाजता प्रयागराज येथे पोहोचेल.
या २२ सेवांपैकी काही सेवा विशेष हंगामानुसार वेगळ्या प्रकारे राबवल्या जाणार आहेत. १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी आणि ७ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान ४ सेवा अतिरिक्त विशेष म्हणून धावणार आहेत. तर ०३ मार्च ते ३१ मार्च दरम्यान ५ फेऱ्या होळी विशेष म्हणून आणि २१ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान १३ फेऱ्या उन्हाळी विशेष म्हणून चालवल्या जातील.
परतीच्या दिशेने ट्रेन क्रमांक ०४१०१ ही साप्ताहिक विशेष गाडी १६ फेब्रुवारी ते १३ जुलै २०२६ दर सोमवारी सायं १८:०० वाजता प्रयागराजहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १४:५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या २२ सेवांपैकीही ४ सेवा अतिरिक्त विशेष, ५ सेवा होळी विशेष आणि १३ सेवा उन्हाळी विशेष म्हणून ठरवल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना उन्हाळी आणि उत्सव हंगामात आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाची संधी मिळणार असून, अतिरिक्त प्रवासी भार नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.