आमचे हिरो अन् आजचे झीरो

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
प्रासंगिक...
 
 
विजय पांढरीपांडे
gen z आमची पिढी खरेच श्रीमंत होती. आमच्यापुढे चांगले आदर्श होते. एकाहून एक राष्ट्रभक्त, विचारवंत हिरो होते. स्वातंत्र्याच्या चळवळीचे ज्वलंत वैचारिक पाठबळ मागे होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांच्या राष्ट्र अस्मिता प्रथम, बाकी सगळे दुय्यम या निष्ठेचे पाठबळ होते. स्वातंत्र्यासाठी आपापल्या परीने योगदान दिलेले महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लाल, बाल, पाल, स्वातंत्र्यवीर सावरकर, शाहू, फुले, डॉ. आंबेडकर अशा एकाहून एक थोर महात्म्यांच्या विचारधारेत आम्ही चिंब भिजलो होतो वेळोवेळी. या सर्वांचे विचार, वेगवेगळे असले तरी त्यांच्यासाठी देशाचे हित हीच प्राथमिकता होती. तीही माणसेच होती. त्यांनीही चुका केल्या असतील किंवा ती त्यावेळची, परिस्थितीची गरजही असेल कदाचित. पण एक निश्चित, त्यांनी आपला स्वार्थ साधला नाही. दुसऱ्याच्या आगीवर आपल्या पोळ्या, भाकरी भाजल्या नाहीत. ते आपल्या मताशी, विचारधारेशी ठाम राहिले शेवटपर्यंत. अगदी भिन्न विचारधारेचे नेते देखील एकत्र बसून एक दुसèयाचे ऐकून घेत असत. वाद घालीत असत. त्यातून सुवर्णमध्य शोधीत असत. कारण त्यांचे वैचारिक मार्ग भिन्न असले तरी गंतव्य स्थान एक होते. अंतिम लक्ष्य एक होते. देश प्रथम, बाकी सगळे दुय्यम! हीच समान विचारधारा होती.
 
 

झेन z 
 
 
हळूहळू सगळेच बदलले. एका पाठोपाठ एक दशके बदलली. शतक देखील बदलले. इंडस्ट्री युग, तांत्रिक युग अन् काय काय आले एका पाठोपाठ एक. सगळेच नावीन्याने भुरळ घालणारे. मोहित करणारे. आपल्या नंतरच्या पिढ्या त्या मोहजालात फसत गेल्या. वाहवत गेल्या. आदर्श मागे पडले. क्षणिक सुख पुढे आले. प्रत्येकाला घाई झाली पुढे जाण्याची. कुठे जायचे माहीत नाही. कशासाठी जायचे माहीत नाही. बरोबर कोण माहीत नाही. असा सगळा संभ्रम. या पिढीला जेन झी म्हणतात. हा शब्द कुठून आला, कसा आला मला माहिती नाही. झेड हे इंग्रजी वर्णमालेतले शेवटचे अक्षर. म्हणजे पुढे काहीच नाही. ध्येय, दिशा काहीच नाही. कशासाठी, कुणासाठी याचे उत्तर नाही. सगळेच भरकटल्यासारखे. दाट धुक्यात वाट हरवल्यासारखे. उद्देशहीन वाटचाल. आपल्याला नेमके कुठे जायचे आहे, तिथेच का जायचे आहे, आपल्याला नेमके काय हवे आहे, कशासाठी हवे आहे, काहीच स्पष्ट कल्पना नाही. फक्त हवे आहे ही भावना, सुप्त आकांक्षा. तेही झटपट हवे आहे. वाट पाहण्याची तयारी नाही. परिश्रम करण्याची जिद्द नाही. शिवाय प्रत्येकाचे वर्तुळ छोटेसे, आक्रसलेले. त्यात इतर कुणाला प्रवेश नाही. प्रत्येकाला म्हणे ज्याची त्याची/तिची स्पेस हवी आहे. फक्त वाद, संवाद नको आहे. दुसèयाचे ऐकून घ्यायचे नाहीय. स्वतःचेच घोडे पुढे दामटायचे आहे.
 
त्यात अवती भवती चांगल्या, आदर्श माणसांचा दुष्काळ आहे. पूर्वीसारखे ज्यांना हिरो म्हणता येईल असे कुणी दिसतच नाही. सगळे स्वार्थी. आपापल्या विश्वात दंग, मस्त. ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यांच्याबद्दल तर विचारायलाच नको. ते स्वतःला आपले पुढारी म्हणवतात. त्यांच्या हातात सत्ता आहे, सरकार आहे. पण त्यांची योग्यता काय? ते आज इथे, उद्या तिथे. खरे तर आज कोण नेमका कुठे हेच कळेनासे झाले आहे. त्यांना गणित येत नाही. पण नंबर गेम येतो! त्यांची सगळी धडपड त्या विशिष्ट नंबर गेमसाठी असते. तो आकडा गाठण्यासाठी कुणीही कधीही कुठेही उडी घेऊ शकतो. प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते म्हणे. पण ती कागदावर. ते तत्त्व, ते विचार फक्त भाषणबाजीसाठी. आज ज्याला शिव्या दिल्या त्याच्याच गळ्यात गळा घालून उद्या ते नाचतील. आज ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तोच उद्या कुंपण ओलांडून इकडे आला की पदरी पडून पवित्र होतो! इथे कुणीच कुणाचा कायमचा मित्र नाही. कायमचा शत्रू नाही. सगळे संधिसाधू.
 
हे कसले हिरो? यांना तर आदर्श कशाशी खातात हेही माहिती नाही. त्यांचे घोटाळे मात्र आदर्श! सगळ्यांच्या करामती एक से बढकर एक! जे लोकशाहीचे मंदिर मानले जाते त्या लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत यांचे वर्तन बघा. शाळेतील मुले देखील कधी इतका गोंधळ करीत नाहीत. ते पीठासीन अधिकाèयाच्या म्हणजे मास्तरच्या अंगावर धावून जात नाहीत. हे तर फक्त आरडाओरडा करतात तिथे. शिव्या देतात एकमेकांना. गलिच्छ भाषेत आरोप करतात एकमेकांवर. यांना आपणच निवडून दिलेले असते आपले अमूल्य मत देऊन. आपल्यासाठी चांगले कायदे करणे, त्याची नीट अंमलबजावणी करणे, आपल्या सर्वांच्या हिताच्या योजना आखणे, त्याची नीट अंमलबजावणी होतेय की नाही ते बघणे, हे यांचे कर्तव्य. पण हे आजच्या पिढीचे हिरो (झीरो) करतात काय प्रत्यक्षात? आपल्या पिढ्यान् पिढ्यांची सोय होईल असा भ्रष्टाचार करतात दिवसाढवळ्या! सर्वांच्या देखत. सर्वांना सर्व माहिती असूनही सर्व मूग गिळून चूप बसलेले असतात. कारण हे सगळे एकाच माळेचे मणी असतात. सगळ्यांची सगळ्या पापात भागीदारी असते. त्यासाठीच तर त्यांना सत्ता हवी असते. समाजसेवा वगैरे बोलण्याच्या गोष्टी. त्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडणारे आपणही तितकेच दोषी. त्यांची गुंडगिरी, त्यांचा दिवसाढवळ्या चाललेला भ्रष्टाचार सहन करणारे आपण, लोकशाहीचे पाईक देखील तितकेच दोषी. किंबहुना जास्त दोषी. कारण आपण अशा गुंड बाहुबलींना निवडून देतो. त्यांच्या कुकर्माला खतपाणी घालतो. बाभळीच्या झाडाला गुलाबाची फुले कशी येतील?
 
या झीरो हिरोंना हाताशी धरून आपणही आपली कामे करून घेतो. आपली पोळी भाजून घेतो. ती खरे तर एकप्रकारे त्यांच्या भ्रष्टाचारात आपली भागीदारीच असते. आपल्यालाही त्यांच्यासारखे बेगडी हिरो व्हायचे असते. आपलाही स्वार्थ साधायचा असतो. ‘सब पंछी एक डालके...’ अशी परिस्थिती. 
केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, सिनेमा, कला अशा सर्वच क्षेत्रांत अशी बजबजपुरी माजली आहे. जुने सिनेमे बघा, त्यातल्या नूतन, मीना कुमारीसारख्या नट्या आठवून बघा. राजा परांजपे, गदिमा, पुल यांचा काळ आठवून बघा. आजचे चित्रपट, आजच्या सीरिअल्स बघवत नाहीत. पण आजचे झीरो हिरो देखील करोडोने कमावताहेत. जेन झीला जे हवे तेच वाढताहेत ताटात. सगळीकडे आनंदी आनंद आहे. मृगजळा पाठीमागे धावण्याचा आनंद.
 
आता आपण नव्याने विचार करण्याची गरज आहे. ज्याला आपण प्रगती म्हणतो ती खरेच प्रगती आहे की अधोगतीकडे वाटचाल? आपण सुख, शांतीकडे वाटचाल करतोय की युद्धाच्या, द्वेष, मत्सर, जाती, धर्म, भेद यांनी दूषित केलेल्या क्षितिजाकडे जातो आहोत? फसवी आमिषे, नाटकी चेहरे, खोटे आभासी संभ्रमित भविष्य अन् त्या वाटचालीवर आपले नेतृत्व करणारे बेगडी झीरो हिरो! सगळेच हास्यास्पद आहे.gen z अचंबित करणारे आहे. गोंधळात टाकणारे, संभम वाढवणारे आहे. खरेच काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. आपण या मोहजालातून जितके लवकर बाहेर पडू, जितक्या वेगाने सतर्क होऊन नवी वाट शोधू तितके बरे. एरवी जेन झीचे काही खरे नाही!
 
7659084555
...0000