मुंबई,
Premanand Maharaj बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या काही वर्षांपूर्वीच्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे अडचणीत सापडला असून ९ कोटी रुपयांचे कर्ज फेडता न आल्याने त्याला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्याचा दोन महिन्यांपूर्वीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो वृंदावन येथे जाऊन आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांची भेट घेताना दिसत आहे.
वृंदावनमधील या भेटीदरम्यान राजपाल यादव भावूक झाल्याचे व्हिडीओत दिसते. त्याने महाराजांसमोर आपल्या खास शैलीत कॉमेडीची झलकही सादर केली, ज्यावर महाराज खळखळून हसताना दिसतात. मात्र त्यानंतर त्यांनी राजपालला दिलेला सल्ला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रेमानंद महाराज यांनी त्याला जीवनातील संकटांचा सामना करण्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले, “आपलं चित्त देवाशी जोडून ठेवणं सर्वांत महत्त्वाचं आहे. आयुष्यात दु:ख आणि संकटं येतातच. आर्थिक समस्या असोत किंवा वैयक्तिक अडचणी, अशा वेळी देवाचं नामस्मरण माणसाला आधार देतं. संकटकाळात अनेक जण दूर जातात, पण देव साथ सोडत नाही.” त्यांनी पुढे “प्रत्येक समस्येदरम्यान धीट राहा, खंबीर राहा, खचू नकोस,” असा सल्लाही दिला.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत असून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी असा कयास लावला आहे की महाराजांना राजपालवर येणाऱ्या संकटाची आधीच जाणीव झाली असावी. मात्र या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.या भेटीत राजपाल यादव पुढील वेळी पत्नीसमवेत दर्शनासाठी येण्याचे आश्वासन देताना दिसतो. त्यावेळी तो स्पष्टपणे भावूक झाल्याचेही पाहायला मिळते. दरम्यान, बॉलिवूडमधील काही कलाकारांकडून त्याला आर्थिक मदत मिळत असल्याचीही चर्चा आहे.
सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ पुन्हा समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. राजपाल यादवच्या पुढील कायदेशीर घडामोडींवर आणि या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.