नोएडा,
The cow blew up the engineer नोएडातील सेक्टर १६८ परिसरात भटक्या गुरांमुळे आणखी एक गंभीर अपघात घडला असून, एका सॉफ्टवेअर अभियंत्याची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी रात्री ग्रेटर नोएडामधील कार्यालयातून दुचाकीवरून आपल्या पीजीकडे परतत असताना हा अपघात झाला. समोरून आलेल्या भटक्या गायीने अचानक धडक दिल्याने अभियंत्याच्या हेल्मेटची काच तुटली आणि शिंगाचा जोरदार प्रहार थेट कपाळावर बसला. चष्म्याचे तुकडेही कपाळात रुतल्याने त्यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली. धडकेनंतर ते रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत कोसळले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा वापर करून कुटुंबीयांशी संपर्क साधला. तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जखमी अभियंता मुरादाबाद जिल्ह्यातील सुरजन नगर येथील रहिवासी असून, ते गेल्या वर्षभरापासून सेक्टर १६८ मध्ये राहत होते. ते ग्रेटर नोएडातील विप्रो या बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, कुटुंबीयांनी एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नोएडामध्ये रस्त्यांवर मुक्तपणे फिरणाऱ्या भटक्या गुरांमुळे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.