वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेची रंगीबेरंगी हाणामारी सांगता

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
सासवड
Veer Shri Nath Mhaskoba Yatra श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे बुधवारी (दि. १२) श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांच्या बारा दिवसांच्या यात्रेचा उत्सव रंगीत “रंगाचे शिंपण” म्हणजेच पारंपरिक “हाणामारी” या सोहळ्याने जल्लोषात पार पडला. लाखो भाविकांनी गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणीत सहभागी होऊन “नाथसाहेबांचं चांगभलं, सवाई सर्जाचं चांगभलं” या जयघोषात ऐतिहासिक यात्रेला साक्ष दिली.
 

Veer Shri Nath Mhaskoba Yatra 
यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी होता. सोमवारी रात्री देऊळवाड्यात छबिन्याची सुरूवात झाली. सर्व पालख्या व काठ्यांसह देवाचे मानकरी लक्ष्मण शिंगाडे यांची भाकणूक झाल्यानंतर छबिन्याची सांगता पार पडली. दुपारी १२:३० वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई व सोनवडी येथील श्रीनाथ म्हस्कोबांच्या मानाच्या पालख्या, काठ्या, अब्दागिरी, निशाण, छत्री, डोलारा व दागिनेदार लवाजम्यासह मंदिरात दाखल झाल्या.
 
 
छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची मंदिरातील प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दुपारी १ वाजता देवाचे मानकरी दादा बुरुंगुले व तात्या बुरुंगुले यांच्या अंगात देव संचारला. या वेळी वार्षिक पीकपाण्याची भाकणूक पार पडली. भाविकांनी गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत “श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं”चा गजर केला. दुपारी १:३० वाजता देवाचे मानकरी भारत जमदाडे (माथेरान) व जमदाडे परिवाराच्या वतीने रंगाचे शिंपण करण्यात आले.
 
 
यात्रेची सांगता पारंपरिक Veer Shri Nath Mhaskoba Yatra हाणामारीत दुपारी २ वाजता देऊळवाड्याबाहेर झाली. दिवसभरात पाच लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आणि यात्रेत सहभाग नोंदविला.यात्रेच्या सुरक्षेसाठी व गर्दी व्यवस्थापनासाठी मंदिर व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, स्वतंत्र वाहन पार्किंगची व्यवस्था, सासवड पोलिस स्टेशन व ग्रामसुरक्षा दलाचा बंदोबस्त, जादा एसटी बससेवा, आरोग्य सुविधा आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.या यशस्वी आयोजनासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, सासवड व जेजुरी नगरपरिषद, बांधकाम विभाग, महावितरण, पोलिस प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भाविकांचे देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य राहिले. देवस्थानचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांनी सहकारी विश्वस्त, सल्लागार मंडळ, यात्रा समिती, सरपंच, ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे आभार मानले.