कोल्हापूर,
Bhima Krushi Pradarshan Kolhapur शेती, तंत्रज्ञान आणि पशुपालन याबाबत अद्ययावत माहिती देणाऱ्या कोल्हापुरातील ‘भिमा कृषी प्रदर्शनाने’ यंदा एका वेगळ्याच कारणामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कृषी क्षेत्रातील साधने, आधुनिक यंत्रसामग्री आणि नवतंत्रज्ञानाबरोबरच यावर्षी प्रदर्शनात ५ फूट लांबीचा अमेरिकन इग्वाना पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या कृषी प्रदर्शनांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या उपक्रमात प्रथमच हा दुर्मिळ सरडा आणण्यात आला आहे. मध्य व दक्षिण अमेरिका तसेच United States मधील उष्ण प्रदेशात आढळणारा हा इग्वाना आकाराने मोठा असून त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपामुळे तो सहजच लक्ष वेधून घेतो. महाराष्ट्रात प्रत्यक्ष पाहण्याची संधी क्वचित मिळत असल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.कुटुंबासह आलेले पर्यटक, शालेय विद्यार्थी आणि लहान मुले या सरड्याला पाहून आश्चर्यचकित होत आहेत. त्याच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी आणि जवळून निरीक्षण करण्यासाठी रांगा लागत असून प्रदर्शनाला मनोरंजनाचा वेगळाच रंग चढला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या विभागात नागरिकांची लक्षणीय गर्दी दिसून येत आहे.
आयोजकांच्या मते, Bhima Krushi Pradarshan Kolhapur प्रदर्शन केवळ शेतीपुरते मर्यादित न ठेवता माहिती आणि अनुभव यांचा संगम घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी क्षेत्राबरोबरच वन्यजीवांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने या इग्वानाचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रदर्शनात येणाऱ्यांची संख्या वाढल्याचेही ते सांगतात.इग्वानाचे मालक किशोर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी आहे. लहानपणी त्याचा रंग हिरवा दिसतो; मात्र वयानुसार त्याच्या रंगात बदल होतो. उन्हात बसल्यावर शरीरावर हलकी काळसर छटा दिसते. उष्ण वातावरणात राहणारा हा प्राणी थंडी सहन करू शकत नाही. त्याचे वजन सुमारे २२ किलो असून लांबी जवळपास ५ फूट आहे. सध्या त्याचे वय आठ वर्षे असून त्याचे आयुष्य साधारण ३० वर्षांपर्यंत असते, अशी माहिती त्यांनी दिली.शेती, तंत्रज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम साधत ‘भिमा कृषी प्रदर्शन’ नागरिकांसाठी माहितीपूर्ण आणि लक्षात राहणारा उपक्रम ठरत आहे. कृषी क्षेत्रातील नवकल्पनांबरोबरच अशा अनोख्या आकर्षणांमुळे प्रदर्शनाचा अनुभव अधिक समृद्ध होत असल्याचे चित्र यंदा पाहायला मिळत आहे.