कोलंबो,
Arshdeep's dance goes viral टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत-पाकिस्तान महासामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भारतीय संघ शुक्रवारी रात्री कोलंबोमध्ये दाखल झाला. १५ फेब्रुवारीला होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या लढतीपूर्वी श्रीलंकेत टीम इंडियाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विमानतळावर पारंपरिक ढोल-नृत्यांच्या गजरात खेळाडूंचे स्वागत झाले आणि या वातावरणात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील कलाकारांच्या तालावर थिरकताना दिसला. त्याचा हा आनंदी अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेतील पहिले दोन सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्ताननेही दोन्ही सामने जिंकले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा सामना केवळ गुणांसाठी नव्हे तर प्रतिष्ठेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. कागदावर भारताचा संघ अधिक संतुलित मानला जात असला तरी दोन्ही बाजूंवर तणाव स्पष्ट जाणवत आहे. दरम्यान, अभिषेक शर्मा खेळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. पोटाच्या संसर्गामुळे त्याला मागील सामना गमवावा लागला होता आणि काही दिवस तो रुग्णालयात उपचार घेत होता. तो संघासोबत असला तरी त्याची अंतिम फिटनेस तपासली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही लढत कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमयेथे संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.