संसदेतील काँग्रेसचा असंसदीय धुडगूस

    दिनांक :14-Feb-2026
Total Views |
दिल्ली अग्रलेख
congresss संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन 13 मार्चपासून सुरू होणार आहे. संसदेची दरवर्षी तीन अधिवेशने होत असतात. त्यातील पावसाळी आणि हिवाळी अधिवेशने सलग होतात, फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत होत असते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होत असते. पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात राष्ट्रपतींचे असे अभिभाषण होत नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा होत असते. या चर्चेला पंतप्रधान उत्तर देत असतात.
यावेळी ज्येष्ठांचे सभागृह असलेल्या राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर सुरळीत चर्चा झाली, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरही दिले. कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभेत मात्र धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे त्या सभागृहात पंतप्रधानांचे चर्चेच्या उत्तराचे भाषणही होऊ शकले नाही. चर्चा आणि पंतप्रधानांच्या उत्तराशिवायच धन्यवाद प्रस्ताव लोकसभेत पारित करावा लागला, यातून एक संसदीय परंपरा खंडित झाली. ज्येष्ठांचे सभागृह असलेली राज्यसभा जो संयम आणि सभ्यपणा दाखवू शकली, तसा संयम आणि सभ्यपणा लोकसभेला दाखवता आला नाही, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.
 
 

parlament  
 
 
लोकसभेत या दरम्यान जो घटनाक्रम उद्भवला, तो संसदीय लोकशाहीला काळिमा फासणारा ठरला. लोकसभेतील विरोधी पक्षांच्या विशेषत: काँग्रेसच्या सदस्यांनी जो गोंधळ घातला, खरं म्हणजे काँग्रेस सदस्यांच्या कृतीला गोंधळ म्हणणे हा अतिशय सभ्य शब्द म्हटला पाहिजे. काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात धुडगूस घातला, नंगानाच केला, असे अतिशय खेदाने म्हणावेसे वाटते. ङ्कगाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होताङ्ख, अशी एक म्हण आहे. बहुधा काँग्रेसचे सदस्य लोकसभेत कधी काळी असा गोंधळ घालतील, हे ही म्हण तयार करणाऱ्यांनी दूरदृष्टीने गृहीत धरले असावे.
 
संसदेच्या दोन्ही सभागृहांत अतिशय संयमाने आणि काळजीपूर्वक शब्द वापरावे लागतात. एखादा शब्द असंसदीय असेल तर तो वापरता येत नाही, कोणी अनवधानाने वा जाणीवपूर्वक वापरला तर तो कामकाजातून वगळला जातो. त्यामुळे गाढव, धुडगूस आणि नंगानाच हे शब्द बहुधा असंसदीय असले तरी काँग्रेसच्या कृतीसाठी ते नाईलाजाने वापरावेसे वाटतात. काँग्रेसच्या सदस्यांचे सर्वांत धक्कादायक कृत्य म्हणजे ते पंतप्रधानांच्या आसनाच्या दिशेने धावत गेले. सभागृहात काही तरी अप्रिय घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, याची कुणकुण लागल्यामुळे मी पंतप्रधानांना सभागृहात येण्यापासून रोखले, असा जो गौप्यस्फोट लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी केला, तो ऐकून तर देशवासीयांना जबरदस्त धक्का बसला. बिर्ला यांनी अप्रिय प्रसंग टळला, असे म्हटले असले तरी तो अप्रिय प्रसंग कोणता असू शकतो, याचा अंदाज देशवासीयांना नक्कीच आला आहे. त्यादिवशी लोकसभेत जे घडले ते पाहून आपण लोकसभेत बसलो आहे, यावर विश्वास बसत नव्हता. जगातील अनेक देशांच्या संसदेत हाणामारी झाल्याचे दृश्य वृत्तवाहिन्यांवर आपण अनेकदा पाहिले आहे, पण तसाच प्रसंग आपल्याही लोकसभेत घडण्याची स्थिती उद्भवली होती, हे पाहून लोकशाहीवर तसेच संसदीय लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांची मान शरमेने खाली झुकली. ज्या महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली, त्यातील काही मूठभर महिला भर सभागृहात असे वागत असतील, गुंडागर्दी करत असतील, पंतप्रधानांच्या आसनाच्या दिशेने धावून जात बॅनर फडकवत घोषणाबाजी करत असतील, तर या देशातील संसदीय लोकशाहीचे भवितव्य कठीण आहे, असे म्हणायला हरकत नाही. सभागृहात विरोधी पक्षांच्या महिला सदस्यांनी पंतप्रधानांवर हल्ला केला असता तर भारतातीतल लोकप्रतिनिधींना जगात तोंड दाखवायला जागा राहिली नसती. संसदेत जर देशाचे पंतप्रधान सुरक्षित राहू शकत नसतील, तर देशात सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहू शकेल, याचा विचार देशवासीयांनी करण्याची वेळ आली आहे.
 
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलायला शब्दही नाही. विरोधी पक्षनेता कसा नसावा, हे राहुल गांधी आपल्या अक्कलशून्य आणि बेजबाबदार वागणुकीने वारंवार दाखवून देत आहेत. देशात आजपर्यंत अनेक विरोधी पक्षनेते झालेत, यातील प्रत्येकाने आपल्या कृतीने आणि भाषणाने त्या पदाची मान उंचावली. पण राहुल गांधी यांच्या कृतीने देशवासीयांची मान कधी न उंचावण्याएवढी खाली झुकली, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. त्यामुळे भाजपाचे निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्यासाठी जो विशेष प्रस्ताव आणला, तो योग्यच म्हटला पाहिजे. दुबे यांनी राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तसेच त्यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, जी योग्य म्हटली पाहिजे.
 
संसदेतील गोंधळाबद्दल विरोधी पक्षांच्या 8 सदस्यांना निलंबित करत सभापती ओम बिर्ला यांनी चूक केली, असे म्हणावेसे वाटते. त्यांनी विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीपर्र्यंतच नाही तर लोकसभेच्या उर्वरित कालावधीपर्यंत निलंबित करायला हवे होते. ओम बिर्ला यांनी असे केले नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच त्यांना भोवला. ङ्कचोर तर चोर वर शिरजोरङ्ख या म्हणीप्रमाणे विरोधकांनीच त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करत आपल्या निर्लज्जपणाचे प्रदर्शन केले. सभागृहात सत्तारूढ रालोआचे बहुमत असल्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव पारित होऊ शकणार नाही, ही गोष्ट वेगळी. पण सभागृहातील चांगुलपणाच्या वागणुकीची शिक्षा विरोधकांनी ओम बिर्ला यांना दिली, असे म्हणायला हरकत नाही.
 
सभागृहातील नवीन विशेषत: विरोधी पक्षांतील जास्तीत जास्त सदस्यांना बोलण्याची संधी बिर्ला देत असतात, पण विरोधी पक्षाच्या या सदस्यांनी कृतघ्नपणाचे प्रदर्शन करत त्यांना पदावरून हटवण्याचे कारस्थान रचले, असे दिसते. सामान्यपणे सभागृहात गोंधळ घालणारे सदस्य सभापतींनी सभागृहाचे कामकाज स्थगित केल्यावर शांत होतात, सभागृहातील तणावाच्या परिस्थितीवर सर्व गटनेते सभापतींच्या दालनात बसून चर्चा करतात, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. पण यावेळी एक नवा धक्कादायक प्रकार समोर आला. सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींच्या दालनात धाव घेत तेथे बिर्ला यांच्याविरोधात घोषणाबाजी केली, त्यांना शिवीगाळ केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या घटनेचा व्हिडीओ जारी करत विरोधी पक्ष सदस्यांच्या गुंडागर्दीचा पर्दाफाश केला, असे म्हणायला पाहिजे. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात आक्रमक राहिले पाहिजे, सरकारला धारेवर धरले पाहिजे, हे बरोबर आहे, पण आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा यातील फरक विरोधी पक्षांनी लक्षात घेतला पाहिजे. विरोधी सदस्यांचे सभागृहात जे वर्तन आहे, ते आक्रस्ताळेपणाचे आहे. देशातील जनता आपल्याला सातत्याने नाकारत आहे, या निराशेतून आलेले आहे, असे म्हटले तर ते चूक ठरू नये.
 
सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष संसदीय लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत. ही चाके व्यवस्थित चालत असेल तर संसदीय लोकशाहीचा रथ व्यवस्थित चालू शकेल, अन्यथा हा रथ कोलमडून पडेल. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवणे ही सभापतींसोबत सत्तारूढ पक्षाचीही जबाबदारी आहे, असे विरोधी पक्षात असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली नेहमी म्हणत असत. त्यामुळे भाजपानेही यादृष्टीने आत्मपरीक्षण करायला पाहिजे, आपले काही चुकत आहे का, विरोधी पक्षांना समजून घेण्यात आणि समजून सांगण्यात आपण कमी पडतो का, याचा विचार केला पाहिजे.congresss लोकसभेचे सभागृह हे चर्चेचे आहे, या ठिकाणी मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे, गुद्यांनी नव्हे. हे आपल्या देशातील विरोधी पक्षांना ज्या दिवशी समजेल, तो सुदिन म्हटला पाहिजे. विरोधी पक्षांच्या सदस्यांना शहाणपण यावे, देवाने सद्बुद्धी द्यावी, अशी लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांची अपेक्षा आहे. विरोधी पक्षांना शहाणपण येईल, अशी अपेक्षा लोकशाहीवाद्यांनी करावी का?