नागपूर,
Handicrafts made from water lilies तलावाच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या जलपर्णीतून आता अतिशय सुंदर आणि टिकाऊ 'हस्तशिल्प' साकारले जात आहे. 'विड टू वेल्थ' या संस्थेच्या संस्थापक स्वाती धोटकर यांनी जलपर्णी या समस्येचे रूपांतर संधीमध्ये करून नागपुरातील अंबाझरी तलावाचे प्रदूषण कमी करण्यासोबतच महिलांना आर्थिक बळ देण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. चंद्रपूरमध्ये स्वतःच्या हिमतीवर हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प यशस्वी केल्यानंतर, स्वाती धोटकर यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत असलेल्या कौशल्य विकास केंद्रात हा अभिनव उपक्रम राबवला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत अंबाझरी तलावातील तब्बल एक एकर क्षेत्रातील जलपर्णी काढून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. जलपर्णीचे देठ, पाने आणि मुळे वेगळी करून ती उन्हात वाळवली जातात आणि त्यानंतर त्यापासून दर्जेदार हस्तशिल्पांची निर्मिती केली जाते. प्रशिक्षण घेतलेल्या १०० महिलांनी आतापर्यंत ८०० हून अधिक वस्तू तयार केल्या आहेत. यामध्ये लॅपटॉप बॅग्स, लेदर बॅग्स, योगा मॅट, सुबक पर्स, फाईल फोल्डर आणि लॉन्ड्री बॅग्स यांसारख्या विविध उपयोगी वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर आणि नागपूर वगळता असा अभिनव प्रकल्प देशात अन्य कोठेही पाहायला मिळत नाही.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेवरूनच नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी या उपक्रमासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पात जागा उपलब्ध करून दिली होती. प्रकल्पाच्या प्रमुख स्वाती धोटकर यांनी अलीकडेच ना. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेऊन सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. त्यावेळी गडकरी यांनी या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. या हस्तशिल्पांचे योग्य मार्केटिंग आणि ब्रँडिंग झाल्यास हा प्रकल्प जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवेल. त्याचवेळी पर्यावरण संवर्धाच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. पर्यावरणाचे रक्षण करतानाच स्थानिक महिलांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध करून देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. प्रदर्शनांच्या माध्यमातून या पर्यावरणपूरक वस्तूंना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, ही कौतुकाची बाब आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धन
जलपर्णी ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या वनस्पतींपैकी एक असून ती तलावांमधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते. ज्यामुळे मासे आणि इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू होतो. शिवाय, जलपर्णी मोठ्या प्रमाणात तलावातील पाणी शोषून घेते आणि तलाव हळूहळू कोरडे पडू लागतात. अशा वेळी ही जलपर्णी केवळ काढून फेकून देणे हा तात्पुरता उपाय ठरतो, कारण ती पुन्हा तितक्याच वेगाने वाढते. मात्र, 'विड टू वेल्थ' हा प्रकल्प या समस्येवर एक शाश्वत उपाय आहे. उपद्रवी जलपर्णीचा वापर हस्तशिल्पांसाठी कच्चा माल म्हणून केल्यामुळे तलावांची नैसर्गिक स्वच्छता होते आणि काढलेल्या कचऱ्याचे पर्यावरणास पूरक वस्तूंमध्ये रूपांतर होते. 'टाकाऊतून टिकाऊ' या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देणारी ही प्रक्रिया आहे.