नवी दिल्ली,
Hardik's video causes a stir टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारताचा पुढील सामना १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे होणार आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीपूर्वी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून, त्यांच्या आगमनाचे काही दृश्य सामाजिक माध्यमांवर झपाट्याने पसरले आहेत. या दृश्यांमुळे संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा चर्चेत आला आहे. प्रसारित झालेल्या दृश्यांमध्ये पांड्या त्याची मैत्रीण माहिका शर्मासोबत दिसत आहे. इतर बहुतांश खेळाडू एकटेच पोहोचल्याचे दिसत असताना पांड्यासोबत त्याची मैत्रीण असल्याने चाहत्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाले. विशेषतः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर या उपस्थितीची चर्चा रंगली आहे.

माध्यमांमध्ये यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वचषक काळात खेळाडूंसोबत कुटुंबीयांना अधिकृत ताफ्यात ठेवण्यास मर्यादा घातल्या होत्या. संघ व्यवस्थापनाने परवानगीची मागणी केल्याचे सांगितले जात असले, तरी ती मान्य झाली नसल्याची चर्चा होती. त्यामुळे पांड्यासोबत माहिका शर्मा दिसल्याने नियमांचे पालन झाले का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्याच्या धोरणानुसार, ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीच्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंना कुटुंबीयांना मर्यादित कालावधीसाठीच सोबत ठेवण्याची मुभा असते. मात्र अधिकृत संघनिवास किंवा अधिकृत प्रवासात त्यांचा समावेश करता येत नाही. खेळाडूंना स्वतंत्र व्यवस्था करण्याची मुभा असली, तरी ती संघापासून वेगळी असणे अपेक्षित असते.या सगळ्या घडामोडींमुळे नियम, शिस्त आणि समानता या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तथापि, याबाबत मंडळ किंवा संघ व्यवस्थापनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.