भारत-पाक सामना...हस्तांदोलनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

14 Feb 2026 15:04:42
कोलंबो,
India-Pak match handshake भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पुन्हा एकदा हस्तांदोलनाच्या मुद्द्यावर चर्चा रंगू लागली आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांनी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे. भारताविरुद्धच्या लढतीत दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतील का, असा प्रश्न विचारला असता आघा यांनी थेट उत्तर देण्याचे टाळत “ते तुम्हाला उद्या दिसेल, एवढेच सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ दोन्ही संघांमध्ये औपचारिक शिष्टाचार टाळले जाऊ शकतात, असा काढला जात आहे.
 

India-Pak match 
 
या विषयाची पार्श्वभूमीही तितकीच संवेदनशील आहे. २०२५ च्या आशिया स्पर्धेदरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे निर्देश दिल्याची चर्चा होती. त्यानंतर वरिष्ठ संघापुरताच नव्हे, तर १९ वर्षांखालील आशिया स्पर्धा आणि २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकातही दोन्ही देशांच्या युवा खेळाडूंमध्ये हस्तांदोलन झाले नव्हते. दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सुरुवातीला पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास अनिच्छा दर्शवली होती आणि बांगलादेशला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत चर्चेनंतर पाकिस्तान सरकारने संघाला सामन्यात सहभागी होण्यास परवानगी दिली. राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खेळाच्या भावनेबाबत विचारले असता आघा यांनी स्पष्ट केले की सामना खेळाच्या नियमांनुसार आणि सौहार्दपूर्ण वातावरणात व्हायला हवा. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे सामन्याच्या निकालाइतकीच उत्सुकता आता खेळाडू मैदानावर कसा व्यवहार करतात, याबाबत निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0