सातबारा दुरुस्तीसाठी ३ हजारांची लाच

बेला येथील महसूल सहाय्यक रंगेहात जेरबंद

    दिनांक :14-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर
revenue assistant सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्ती व नाव कमी करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बेला (ता. उमरेड) येथील महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर पथकाने केली आहे
 


Nagpur, Bela, revenue assistant 
विजय भगवानजी शडमाके असे लाचखोर महसूल सहाय्यकाचे नाव आहे.तक्रारदाराने त्यांच्या व नातेवाईकांच्या नावामध्ये सातबारा उताऱ्यावर दुरुस्ती करण्यासाठी तसेच आईचे नाव कमी करण्यासाठी अपर तहसील कार्यालय, बेला येथे अर्ज केला होता. संबंधित कामासाठी महसूल सहाय्यक विजय भगवानजी शडमाके यांनी सुरुवातीला ४ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ३ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी २ हजार रुपये आधीच स्वीकारण्यात आले होते, तर उर्वरित १ हजार रुपये नंतर देण्यास सांगण्यात आले.
तक्रारदाराने याची तक्रार नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. पडताळ णीदरम्यान आरोपीने पूर्वी घेतलेल्या २ हजार रुपयांचा उल्लेख करून उर्वरित लाचेचे १ हजार रुपये शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार भ्रष्टाचार विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी बेला येथे सापळा रचला. दरम्यान आरोपी शडमाकेने तक्रारदाराकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला झडप घालून पकडण्यात आले.
या प्रकरणी बेला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली.ही कारवाई अँटी करप्शन ब्यूरो नागपूर येथील पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक महेश कोंडावार यांच्या पर्यवेक्षणात, पोलीस निरीक्षक मुयर चौरसिया व त्यांच्या पथकाने केली.
 
 
भ्रष्टाचार विरोधी विभागाचे आवाहन
भ्रष्टाचार विरोधी पथकाव्दारे नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती (एजंट) कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक :
पोलीस अधीक्षक कार्यालय – ०७१२-२५६१५२०
टोल फ्री – १०६४
व्हॉट्सअॅप – ९०६७६७१०६४