अनिल कांबळे
नागपूर,
government dental college रशियातून आणलेली 4 काेटी 32 लाख रुपये किंमतीचे ’डेंटल सिम्युलेटर’ यंत्रे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात बंद अवस्थेत आहेत. ती यंत्रे शिकाऊ डाॅक्टरांच्या ’प्रि-क्लिनिकल’ प्रशिक्षणासाठी असून ती सुरू हाेण्यापूर्वीच नादुरुस्त ठरली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून धूळखात पडून आहेत. याप्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दखल घेतली आणि स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने अॅड.आयुषी डांगरे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करत दाेन आठवड्यात रीतसर याचिका दाखल करण्याची सूचना केली.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंजुरीनंतर दंत महाविद्यालयात एका रशियन कंपनीकडून तीन सिम्युलेटर खरेदी करण्यात आले. दंतशल्य, कृत्रिम दंत आणि मुखशल्य या विभागांसाठी उपलब्ध या यंत्रांचे 31 मे 2025 राेजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लाेकार्पण झाले. मात्र चाचणी दरम्यान दंतशल्य व कृत्रिम दंत विभाग प्रमुखांनी यंत्र उपयाेगी नसल्याचे स्पष्ट केले, तर मुखशल्य विभागाचे प्रमुख डाॅ. प्रशांत पंदिलवार यांनी ते सुरू असल्याचे नमूद केले. प्रत्यक्षात हे यंत्र इंजेक्शन देण्यापुरतेच मर्यादित असल्याची माहिती पुढे आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली काेट्यवधी रुपयांचा खर्च करूनही प्रत्यक्षात त्याचा उपयाेग झाला नाही. प्राप्त माहितीनुसार, अशा प्रकारच्या सिम्युलेटरची अपेक्षित किंमत जास्तीत जास्त दीड काेटी रुपयांपर्यंत असते. तरीही 4.32 काेटी रुपये माेजण्यात आले. सिम्युलेटर सुरू करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने संबंधित कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला. कंपनीचे इंजिनिअर येऊन गेल्यानंतर काही नवीन सुटेभाग बसवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आणि ते रशियातून मागवण्यातही आले. न्या.अनिल किलाेर आणि न्या.राज वाकाेडे यांच्या खंडपीठाने या गंभीर प्रकाराची दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.