अनिल कांबळे
नागपूर,
fake kidnapping, शुक्रवारी दुपारी नागपूर शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका प्रकारामुळे पोलीस यंत्रणेत काही काळासाठी चांगलाच गोंधळ उडाला. विवाहित महिलेचे अपहरण झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्याने पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली होती; मात्र तपासाअंती ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
माहितीनुसार, ३० वर्षीय विवाहित महिलेचे राहुल नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती महिलेच्या पतीला लागल्याने त्याने पत्नीला रंगेहात पकडण्याचा बेत आखला. सदर महिला शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडताच, पतीने कारने तिचा पाठलाग केला. संघर्ष नगर परिसरात ती राहुल नावाच्या तरुणासोबत बोलत असल्याचे दिसताच पतीने अचानक तेथे धडक देत दोघांना अर्वाच्य शब्दात जाब विचारला.अचानक समोर आलेल्या पतीमुळे महिलेची भंबेरी उडाली.या गोंधळात पतीने राहुलला चांगलीच शिवीगाळ केली. रस्त्यावर सुरु असलेल्या या भांडणामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पतीने महिलेला आपल्या वाहनात बसवून सोबत नेले. वाहनात इतरही व्यक्ती असल्याची माहिती आहे.
दरम्यान चिडलेल्या राहुलने प्रेयसीच्या पतीला धडा शिकविण्याचे उद्देशाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून महिलेचे अपहरण झाल्याची खोटी माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने हालचाली सुरू केल्या. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर संपूर्ण प्रकार हा कौटुंबिक वादातून निर्माण झालेला असल्याचे स्पष्ट झाले. कोणतेही अपहरण झाले नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या प्रकरणात कोणाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून, पोलिसांनी संबंधितांना समज देत प्रकरणावर पडदा टाकला आहे.