वेध...
gratitude जगातील सर्वांत स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला आहे. एकाकडे मागा हजार जण देतील. मात्र जगातील सर्वांत महाग गोष्ट म्हणजे मदत होय. हजार जणांना मदत मागा, त्यापैकी एखादाच करेल. ही वस्तुस्थिती असतानाही वेळ आल्यावर रडून मदत घेणारे आज धन्यवाद देणे विसरले आहेत. तसा विचार करता सापाच्या दातात, विचंवाच्या नांगीत आणि दुर्जन व्यक्तीच्या मनात किती विष भरलेलं आहे, हे कोणालाच माहीत नसतं. म्हणूनच या तिघांपासून सावध राहा असा सल्ला अनुभवी आपल्याला वारंवार देत असतात. तरीही समाजभान जपणारे लोक सढळ हाताने पीडितांना, गरजवंतांना मदतीचा हात देत धन्यता मानतात. मात्र जी मंडळी रडून मदत मिळविते, ती नंतर त्यांच्याप्रति कृतज्ञताही व्यक्त करीत नाही. याचे कारण काय याचाही शोध घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तसे पाहता पूर्वीचे लोक सांगून गेले की, ‘ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे’ याचाही प्रत्यय लोकांना वारंवार येत आहे. आपल्या संस्कृतीचा विचार केला असता, सर्वांनाच कृतज्ञता व्यक्त करण्याची गोष्ट पुन्हा एकदा शिकवावी लागणार आहे. वस्तुत: शाळेत लघुकोन, काटकोन, त्रिकोण, चौकोन शिकविले जातात. पण आपले कोण हे मात्र परिस्थिती शिकवते. याच परिस्थितीचे भान ठेवत शाळांनी, पालकांनी आणि समाजानेही पुढाकार घेत सर्वांनाच मदत करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवायला हवे. धन्यवाद दिल्याने माणूस लहान होत नाही. उलट मदत करणारा सुखावून पुन्हा तिसऱ्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर राहतो. यालाच तर चांगले कार्य म्हटले जाते ना?

तसे पाहता वर्तमानात कृतज्ञता आणि कृतघ्नपणा यातील भेदही मुला-मुलींना सांगायला हवा. आज मानवी मन स्वार्थी झाले आहे. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ ही संस्कृती आता वाढली आहे. ही संस्कृती मानवतेसाठी घातक ठरू शकते. आता नाही का एका मुलाने आपल्या नातेवाईकाचा मृतदेह स्वत:च झोळी बांधून गावात नेला. त्याला शववाहिकाही मिळाली नाही. हे कशाचे द्योतक आहे, याचाही विचार करायला हवा. 140 कोटी लोकसंख्येच्या देशात कोट्यवधी गाड्या असताना एकही वाहन त्याला मिळत नाही, ही बाब नक्कीच विचार करायला लावणारी आहे. सरसकट सर्वच लोक एवढे निष्ठुर का झाले असावेत, ही बाब नक्कीच चिंतनीय ठरली आहे. चांगले काम केल्यावर ते विसरून जा अशीच शिकवण आपल्याला मिळाली. फक्त कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा करू नको असेही सांगितले गेले. कृती कुठलीही असो, ती झाल्यावर काही ना काही परिणाम होणारच आहे, हेच विज्ञानाने सांगितले. ‘प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते’ हा नियम पाहता तुम्ही केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृतींचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ही बाब विज्ञानाने पटवून दिली आहे. मग विज्ञान विसरून कसे चालणार? तसे पाहता समाजात कर्णाची फौज निर्माण करायची झाल्यास चांगले काम करणाऱ्यां ची प्रशंसा व्हायला हवी. येथे तर मदत करणारा कर्ण कुठे अडतो अन् केव्हा त्याला संपवितो असाच कृतघ्न समाज आपण निर्माण करीत आहोत. मग तुम्हाला मदत करणारा नेमका कसा उपलब्ध होईल? अपघातग्रस्तांना मदत करा, तुम्हाला शासनाकडून 25 हजार रुपये पारितोषिक मिळेल, अशी घोषणा सरकारला करावी लागते, ही बाब भूषणावह नसून, लाजिरवाणी आहे. जी व्यक्ती जन्माला आली, तिच्याकडून मदतीचा भाव अभिप्रेत आहे. पण केवळ मदत घेणारे वाढले. मात्र मदत करायची झाल्यास मला काय त्याचे असे म्हणत पळ काढणाऱ्यांचीच फौज समाजाने तयार केली आहे. याच कारणाने आज समाजात दुर्योधन वाढले अन् कर्ण नामशेष झाले आहेत. पूर्वी आपल्याकडे अनेक दानशूर मदत करायचे.gratitude पण त्यांचे कौतुक करायचे सोडून केवळ समाजाने त्यांना बदनाम करण्यावरच भर दिला. परिणामी ‘नेकी कर जूते खा’ हा प्रकार समाजभान जपणाऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. फार पूर्वी एखाद्या सद्गृहस्थाने मदत केली तर त्याच्याविषयी संबंधित व्यक्ती चारचौघात कृतज्ञता व्यक्त करून धन्यवाद द्यायचा. परिणामी तो मदत करणारा सद्गृहस्थ मनातल्या मनात सुखावून जायचा आणि पुन्हा अनेकांना मदतीसाठी सदैव हात जोडून तत्पर राहायचा. आता मात्र संकटात असलेला प्रथमत: मगरीप्रमाणे अश्रू ढाळतो अन् मदत मिळवतो. पण त्यानंतर तो मदत करणाऱ्यांना धन्यवादही द्यायला विसरतो. आपण मुलांकडून असाच कृतघ्नपणा अपेक्षित ठेवला आहे का? याचे उत्तर नाहीच असे राहील. मग आजपासून मदत करणाऱ्यांबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त करण्याची मोहीमच हाती घ्यावी लागेल. तेव्हाच मदत करणारे सुखावतील अन् समाजात दुर्योधन कमी होऊन कर्ण वाढतील.
अनिल उमाकांत फेकरीकर
9881717859
...