एमबीए-एमएससी धारक पोलीस भरतीसाठी मैदानात!

    दिनांक :14-Feb-2026
Total Views |
बीड,
Police recruitment for MBA-MSC holders बीड जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रियेतून बेरोजगारीचे तीव्र चित्र पुढे आले आहे. जिल्हा पोलीस दलातील १७४ रिक्त पदांसाठी तब्बल ८ हजार १३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यामध्ये उच्चशिक्षित तरुणांचा मोठा सहभाग दिसून येतो आहे. केवळ बारावी उत्तीर्ण ही पात्रता असलेल्या शिपाई पदासाठी अभियंते, व्यवस्थापन आणि संगणकशास्त्रातील पदवीधर तसेच पदव्युत्तर तरुण मैदानात उतरल्याने रोजगाराच्या मर्यादित संधींचे वास्तव अधोरेखित झाले आहे.
 
 
Police recruitment for MBA-MSC holders
 
अर्जांची छाननी केल्यानंतर सुमारे २ हजार ६५३ उमेदवार पदवीधर असल्याचे स्पष्ट झाले. कला शाखेतील १ हजार ४२८, विज्ञान शाखेतील ५८२ आणि वाणिज्य शाखेतील ३२१ उमेदवारांचा यात समावेश आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले ४७ तर औषधनिर्माण क्षेत्रातील १९ उमेदवारही या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, ३८८ पदव्युत्तर उमेदवारांनीही शिपाई पदासाठी अर्ज केला आहे. त्यात १९५ एम.ए., ५९ एम.कॉम. आणि ५६ एम.एससी. धारकांचा समावेश असून, १९ व्यवस्थापन पदवीधरही नोकरीच्या शोधात या भरती प्रक्रियेत उतरले आहेत. उच्च शिक्षण पूर्ण करूनही अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने स्थिर नोकरीसाठी पोलीस दलाचा पर्याय निवडत असल्याची प्रतिक्रिया अनेक उमेदवारांनी व्यक्त केली.
 
 
भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी विशेष काळजी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे. मैदानात उत्तेजक पदार्थांचे सेवन करून आलेल्या उमेदवारांना तंबी देण्यात आली असून, नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील ९७ जागांसाठी तब्बल १० हजार ६७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. तेथील भरती प्रक्रियाही आजपासून सुरू झाली असून ती जवळपास महिनाभर चालणार आहे. ८५ देखरेख कॅमेरे आणि ओळख पडताळणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रक्रिया पार पाडली जात आहे. बीडमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणीत दोन वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली असून दररोज सुमारे हजार उमेदवारांचे नियोजन करण्यात येत आहे. बेरोजगारीच्या वाढत्या छायेत पोलीस भरतीकडे तरुणांचा वाढता ओढा स्पष्टपणे दिसून येत आहे.