शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...!

    दिनांक :14-Feb-2026
Total Views |
 
 
rashtriya swayamsevak sangh 8 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली म्हणून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. समाज माध्यम, पत्रकारिता, कलाकार इत्यादी मान्यवरांनी सरसंघचालकांना प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांवर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी उत्तम मार्गदर्शन केले. 1925 साली स्थापन झालेली एक संघटना, या संघटनेने 100 वर्षे पूर्ण केलीत. या 100 वर्षांच्या कालावधीत काही वेळा बंदीचे सावट आले, प्रचंड टीका झाली. लोकशाही मूल्यांचे पालन करीत असतानाही लोकशाहीविरोधी, संविधानविरोधी असे आरोप झालेत. अनेक स्वयंसेवकांच्या जिवावर बेतेल असे प्रसंग आले. केरळमधील परिस्थिती सर्वांच्याच परिचित आहे. देशाच्या आपत्तीमध्ये सर्वांत प्रथम उपस्थिती लावूनही थट्टेचा सामना करावा लागला आणि इतकं सगळं होऊनही या संघटनेने अधिकृतपणे कोणाविरुद्ध कारवाई केली नाही किंवा साधी टीकाही केली नाही. इतक्या प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतून 100 वर्षे पूर्ण करणे हे अग्निपरीक्षा देण्यापेक्षा काही कमी नव्हते. अशा परिस्थितीत कुणी संघाचे विरोधक जरी असले, तरी या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय पक्ष नाही; ती एक सामाजिक संघटना आहे.
 
 

RSS  
 
 
या सामाजिक संघटनेविषयी तरुणांमध्ये इतके आकर्षण का आहे? याचाही विचार व्हायला हवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, संघाची स्थापना महाराष्ट्राच्या भूमीत झाली. ज्यावेळी भारतभर ग्लानी पसरली होती, परकीय आक्रमकांनी हैदोस माजवला होता, जिहादी अतिरेकी प्रवृत्तीचं प्राबल्य वाढत होतं, त्यावेळी मराठी मातीने आपलं तिसरं नेत्र उघडलं... 15-16 वर्षांच्या एका कोवळ्या मुलाने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि पुढे त्या महामानवाने स्वराज्य स्थापन करून दाखवलं. परकीय आक्रमकांच्या विरोधात अनेक लोक लढतच होते. कुठे ना कुठे उठाव होतंच होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसामध्ये एक विश्वास निर्माण केला. ही भूमी आपली आहे, हिंदूंची आहे. इथे हिंदूंचे राज्य असले पाहिजे. स्वराज्य असले पाहिजे.
 
पुढे मराठ्यांनी भारतावर भगवा फडकवला. जिथे जिथे मराठ्यांची सत्ता होती, तो भाग आज भारत म्हणून ओळखला जातो. ही मराठी माणसाची ताकद आहे. हिंदुत्वाचं काय होणार असा प्रश्न जेव्हा जेव्हा निर्माण झाला, तेव्हा तेव्हा मराठी माणूस तलवार घेऊन सर्वार्ंत आधी आणि सर्वांत पुढे गेला आहे. पण ज्या मराठी माणसांनी ग्लानीत असलेल्या भारताला जागं केलं, त्याच मराठी माणसाला ग्लानी आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर असा एकही मोठा मराठी नेता झाला नाही, ज्याने मराठी माणसाला योग्य मार्गदर्शन केले असेल. स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व मराठी माणसाने केलं होतं. मग ही ग्लानी का आली? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषिक राज्यांनुसार भारताची रचना झाली तेव्हा महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट काँग्रेसने रचला. नेहरू हे मराठीद्वेष्टे होते, असं काही जणांचं मत आहे. पण मराठी माणसाने नेहरूंच्या विरुद्ध उठाव करून मुंबई मिळवलीच. त्यासाठी 105 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. त्यानंतर मराठी राजकारण्यांनी मुंबई केंद्र ठेवून महाराष्ट्राचं राजकारण केलं. काही राजकारण्यांना मुंबईच्या समस्या या सबंध महाराष्ट्राच्या समस्या वाटू लागल्या. त्यातूनच मुळातच समृद्ध असलेल्या मराठी भाषेबाबत भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. कदाचित या गोष्टी मुद्दाम केल्या गेल्या नसतील, पण न्यूनगंडातून त्या झाल्या असतील. या सर्व गोष्टींची आठवण काढण्याची दोन कारणं आहेत. एक, संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमावर स्वतःला आधी मराठी हृदयसम्राट म्हणून घोषित केलेले नंतर हिंदुजननायकमध्ये बदली झालेले व तिथून काही प्राप्त न झाल्याने आता पुन्हा मराठी हृदयसम्राट झालेले राज ठाकरे यांनी टीका केली आहे. भविष्यात ते कोणत्या प्रकारचे हृदयसम्राट किंवा जननायक होतील, याची आत्ताच शाश्वती देता येत नसली, तरी सध्या आपण त्यांच्या सन्मानार्थ मराठी हृदयसम्राटच मानू. बरं, ते मराठी हृदयसम्राट का आहेत, तर ते जावेद अख्तर व इतर मराठी न येणाऱ्या बॉलिवूड कलाकारांसोबत वावरतात आणि अधूनमधून ते मराठीचे मुद्दे उपस्थित करीत असतात. त्यांचे कार्यकर्ते यूपी-बिहारमधल्या लोकांना मारहाण करतात, त्यांच्यावर टीका करणाèया अस्सल मराठी मुलांनाही मारहाण करतात. कारण तेच मराठीचे तारणहार असल्याने त्यांच्यावर केलेली टीका ही मराठीवर केलेली टीका असे गृहीत धरून त्यांचे कार्यकर्ते झुंडीने जाऊन एका नि:शस्त्र व्यक्तीला बेसावध असताना मारतात. हा त्यांच्या दृष्टीने फार मोठा पराक्रम होय! या अशा अनेक सद्गुणांसाठी ते मराठी हृदयसम्राट आहेत.rashtriya swayamsevak sangh असो. तर या मराठी हृदयसम्राटांनी सरसंघचालकांवर टीका केली. कारण त्यांच्या मते ‘भाषेबद्दल आग्रही राहून आंदोलन करणे हा एक आजार आहे’ अशा आशयाचं विधान सरसंघचालकांनी केलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर मराठी आणि परकीय इंग्रजी भाषेत पोस्ट लिहून टीका केली. या पोस्टमध्ये मराठी हृदयसम्राट म्हणाले, ‘‘या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांना बोलाविण्यात आले होते, त्यातले काही हजरदेखील होते. परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती!’’ आता सरकारी भीती हे जर म्हटलं तर मराठी हृदयसम्राटांनी बिनशर्त पाठिंबा याच भीतीमुळे दिला, असे आपल्याला विनाकारण मानावे लागणार आहे. दुसरी याच कार्यक्रमात सरसंघचालकांनी मातृभाषेबद्दल भाष्य केले. संघ मातृभाषेविषयी आग्रही आहे, असे स्पष्ट केले. इंग्रजीचा द्वेष नाही, जिथे जिथे इंग्रजीची आवश्यकता आहे, तिथे तिचा वापर अस्खलित करायचा. पण संघाची भूमिका भारतीय भाषांविषयी आहे, हे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर मराठी हृदयसम्राटांनी टीका करण्याचे काहीच कारण नव्हते. कदाचित त्यांनी तेवढीच क्लिप बघितली असावी. असो.
 
या गोष्ट आठवण्याचं दुसरं कारण म्हणजे, 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. 1960 ला महाराष्ट्राची नव्याने निर्मिती झाली. या 66 वर्षांत बèयाच गोष्टी बदलल्या आहेत. मराठी शाळा आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. आपल्याला मराठी भाषेविषयी आग्रही राहायचे आहे, म्हणजे नेमके काय करायचे आहे? तर, सर्वांत आधी प्राधान्य मराठीला द्यायचे आहे. मराठी शाळांना प्राधान्य द्यायला हवे. त्यानंतर आपल्याला आवर्जून मराठी बोललं पाहिजे. मुलांना मराठी पुस्तके वाचायला लावली पाहिजेत, ऑडिओ पुस्तके ऐकायला लावली पाहिजेत. सोसायटींमध्ये मराठीविषयक कार्यक्रम आयोजित झाले पाहिजेत. दुसरी गोष्ट मराठी तरुणांनी आंदोलनांपासून दूर राहिलं पाहिजे आणि स्वतःची प्रगती साध्य केली पाहिजे. नोकरी, उद्योग, स्वयंरोजगार यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सरकारी नोकरीतही टक्का कसा वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे सौम्य वाटणाèया अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याद्वारे मराठी भाषेचे जतन करता येईल आणि मराठी संस्कृतीही जपता येईल. मराठी माणसाला राजकारणाचं खूप वेड आहे. सर्वांत आधी तो पक्षाचा झेंडा खाली ठेवून छत्रपतींचा भगवा झेंडा हाती घेतला पाहिजे. म्हणजे स्वकर्तृत्वाने जग काबीज करण्याचं ध्येय हाती घेतलं पाहिजे. ‘साहेब’ इत्यादी लोकांपासून चार हात लांब राहिलं पाहिजे. काही मोजके लोक सोडले तर बहुसंख्य मराठी माणूस हुशारच आहे. म्हणूनच मदांध झालेल्या लोकांना मराठी माणसाने महाराष्ट्रभरात विविध निवडणुकींत त्यांची जागा दाखवून दिली आहे. मदांध तख्त मराठी माणसाने फोडलं आहे. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या संघटनेने 100 वर्षे पूर्ण केली आहेत. आज हे संघटन केवळ देशभरात नव्हे तर जगभरात पसरले आहे. ही मराठी माणसाची ताकद आहे.
 
जयेश शत्रुघ्न मेस्त्री