पुणे,
Pune Zilla Parishad जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी (दि. १३) उत्तर पुण्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक घेत स्थानिक राजकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या बैठकीमुळे त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली आणि मावळ तालुक्यातील सदस्यांसोबत चर्चा करताना पवार यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या घडामोडी, स्थानिक राजकीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके, भोरचे आमदार शंकर मांडेकर, जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके, खेड-आळंदीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच अशोक पवार यांनी उपस्थित राहून त्यांची भेट घेतली.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७३ पैकी ५१ गटांमध्ये विजय मिळविला असून १३ पैकी ८ पंचायत समित्यांवर स्पष्ट बहुमत मिळविले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील दोन्ही गटांमधील समन्वय आणि काही ठिकाणी सुरू असलेली धुसफूस लक्षात घेता ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
बैठकीत बोलताना पवार म्हणाल्या, “अजित पवार हे कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असत. आता तुमच्या पाठीशी कोणी नाही असे समजू नका. ज्या पद्धतीने अजितदादा काम करत होते, त्याच पद्धतीने काम केले जाईल. नवनिर्वाचित सदस्यांना प्रशासकीय कामात पूर्ण मदत केली जाईल. प्रलंबित कामांचा आढावा घेऊन ती पूर्ण करण्यात येतील.” त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीतील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
काही ठिकाणचे पराभूत उमेदवारही पवार यांना भेटले. प्रचारादरम्यान आलेल्या अडचणी, मतांतील फरक आणि स्थानिक प्रश्न यांची माहिती त्यांनी घेतली. पुढील काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचे खेड येथील पक्षाच्या अश्विनी पाचरणे यांनी सांगितले.जुन्नरमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना माजी आमदार अतुल बेनके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “जिजामातांसारखी चुणूक सुनेत्रा पवार वहिनींमध्ये दिसते. अजित पवार जसे जुन्नर तालुक्याला पाठबळ देत होते, तसेच पाठबळ त्या देतील.” तसेच, “मी आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या समन्वयातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढविल्या. पुढे काय होईल माहीत नाही; मात्र जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित वाटचाल करतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उत्तर पुण्यातील या बैठकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षांतर्गत समन्वय, स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि आगामी निर्णयप्रक्रिया यावर या बैठकीचा परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.