नवी दिल्ली,
Upheaval in the World Cup भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २० २६ स्पर्धेने अवघ्या आठवड्यातच रंगत पकडली आहे. सात दिवसांत २१ सामने पूर्ण झाले असले तरी अद्याप एकाही संघाने सुपर ८ फेरीतील अधिकृत प्रवेश निश्चित केलेला नाही आणि कोणताही संघ औपचारिकरीत्या बादही झालेला नाही. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीच्या निकालांमुळे काही संघांचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी आपले पहिले दोन सामने जिंकत गुणतालिकेत भक्कम स्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे सुपर ८ मध्ये स्थान मिळवण्यासाठी हे संघ आघाडीवर मानले जात आहेत.

दुसरीकडे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी एका पराभवाचा धक्का बसला असला तरी त्यांच्या पुढील सामन्यांवर त्यांचे भविष्य अवलंबून आहे. दरम्यान, काही संघांना अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. कॅनडा, नेपाळ, आयर्लंड, ओमान, अमेरिका आणि नामिबिया यांना सुरुवातीच्या सामन्यांत अपयश आले असून त्यांची पुढील फेरीतील शक्यता अत्यंत क्षीण झाली आहे. उर्वरित सामने जिंकून आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहूनच त्यांना संधी मिळू शकते. गट अ मधून भारत आणि पाकिस्तान पुढे जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. गट ब मध्ये झिम्बाब्वे आणि श्रीलंका मजबूत स्थितीत आहेत, तर गट क मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड आघाडीवर आहेत. गट ड मध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवत आघाडी घेतली आहे. या दोन्ही संघांमधील सामना निर्णायक मानला जात असून विजय मिळवणाऱ्या संघाचे सहा गुण होतील आणि पुढील फेरीकडे त्यांची वाटचाल जवळपास निश्चित होईल.
आज होणाऱ्या सामन्यांमध्ये आयर्लंड आणि ओमान यांच्यातील लढत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी असल्याने या सामन्यातील पराभव त्यांच्या सुपर ८ च्या आशा संपवू शकतो. विजय मिळवणाऱ्या संघाला मात्र स्पर्धेत टिकून राहण्याची संधी मिळेल, पण त्यासाठी पुढील सामन्यांतही विजय अनिवार्य असेल.एकूणच, स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात समीकरणे गुंतागुंतीची झाली असून पुढील काही दिवसांत सुपर ८ चे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.