पतीचा जीव वाचवताना पत्नीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

14 Feb 2026 12:15:09
नाशिक,
Wife dies of electric shock जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एक अंत:करण पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शिंदेवाडी येथे एका महिलेने पतीचा जीव वाचवताना स्वतःचा जीव गमावल्याने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. छाया दीपक खाडे (वय ३८) यांनी प्रसंगावधान राखत विजेच्या प्रवाहात अडकलेल्या पतीला दूर ढकलून सुरक्षित केले; मात्र त्या स्वतःच विजेच्या झटक्यात सापडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी दीपक खाडे (वय ४२) हे शेतातील विहिरीवर पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. वीजपंप सुरू करताना अचानक त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. हा प्रकार लक्षात येताच छाया खाडे तत्काळ त्या ठिकाणी धावून गेल्या. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पतीला विजेच्या संपर्कातून दूर केले. त्यामुळे दीपक खाडे यांचा जीव वाचला; पण या धावपळीत छाया स्वतःच विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्या.
 
 
 
Wife dies of electric shock
गंभीर अवस्थेत त्यांना सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. गावकऱ्यांच्या मते, छाया खाडे या अत्यंत कुटुंबवत्सल आणि मदतीला धावून जाणाऱ्या स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू-सासरे, मुलगा आणि बारावीला शिकणारी मुलगी असा परिवार आहे. मुलीच्या परीक्षेच्या काळातच आईचे छत्र हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
दरम्यान, जिल्ह्यातीलच निफाड तालुक्यात आणखी एक दुर्दैवी घटना घडली. खेडलेझुंगे येथे शेतीकामासाठी आलेल्या ३८ वर्षीय मजुराने विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाला. विलास देवराम दरोडे (रा. खडकी शिंगाळी, ता. पेठ) असे त्यांचे नाव असून, प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच पत्नीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लासलगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0