बुलढाणा,
zilla-parishad-divisional-sports : स्थानीय जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार समारोप व बक्षीस समारंभ दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पार पडला. गृह मैदानांचा तसेच स्थानिक प्रेक्षकांच्या भरगच्च प्रतिसादाचा पुरेपूर फायदा घेत यजमान बुलढाणा जिल्हा परिषदेने सर्वसाधारण विजेते पदावर शिक्कामोर्तब केले. तर अमरावती जिल्हा परिषदेने सांघिक कामगिरीच्या बळावर उपविजेतेपद पटकाविले.
संगीतमय वातावरण व फटायांची आतिषबाजी अशा उत्साहपूर्ण वातावरणात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बक्षीस वितरण समारंभास आ. धीरज लिंगाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी खांदे, उपजिल्हाधिकारी शेलार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या सुविद्यपत्नी रीपिका खरात.आयोजन समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार प्रमोद एंडोले यवतमाळचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आबाळे अकोल्याचे परिहार माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ योजना विभागाचा शिक्षणाधिकारी वैशाली ठग जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल माने. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत. अॅड. शर्वरी तुपकर.पाचही जिल्हा परिषदांचे जिल्हा क्रीडा समन्वयक. विविध जिल्हा परिषद खातेप्रमुख व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
या विभागीय स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवात बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ व वाशिम या ५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. उदघाटन समारंभाच्या दिवशी खेळाडूंनी केलेल्या पथसंचालनात सादर केलेल्या आकर्षक देखाव्यांमध्ये भुकेची कहाणी सादर करणार्या जिल्हा परिषद यवतमाळने प्रथम क्रमांक पटकाविला तर अॅसिड अटॅक व माय मराठी या विषयावर केलेल्या सादरीकरणास बुलढाणा जिल्हा परिषदेला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात टेनिक्वाइटमध्ये बुलढाण्याने ६ पारितोषिके पटकावले तर अमरावतीच्या पदरी ५ बक्षिसे मिळालीत. बॅडमिंटन क्रीडा प्रकारात आपली घोडदौड कायम ठेवीत बुलढाणा व अमरावतीच्या चमूने प्रत्येकी ११ प्रकारात विजेतेपद व उपविजेतेपद पटकाविले.
सर्वसाधारण विजेतेपदामध्ये सुरू असलेली बुलढाणा व अमरावतीची धावण्याची शर्यत ही धावण्याच्या क्रीडा प्रकारात सुद्धा तुल्यबळ होती. दिव्यांग कर्मचारी गटामध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेला १२ क्रीडा प्रकारात यश मिळाले. येथे सुद्धा अमरावतीने बुलढाण्याचा पाठलाग करीत १० ठिकाणी यश संपादन केले. क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, खोखो इत्यादी सांघिक क्रीडा प्रकारात सुद्धा तुल्यबळ लढती झाल्या, अखेरीस बुलढाणा जिल्हा परिषदेच्या चमूने सर्वसाधारण विजेतेपद पटकावून अमरावतीला उपविजेतेपदावर रोखले. तर यवतमाळ, अकोला व वाशिम यांना संमिश्र यश मिळाले. सर्व विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचा तसेच संघांचा स्मृतिचिन्ह मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे व किरण वाघमारे यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य करणार्या सर्व घटकांचे तसेच मान्यवरांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने बक्षीस वितरण समारंभाचा समारोप झाला.