साहित्याची जाण नसणाऱ्यांना अध्यक्षपदाचे ‘डोहाळे’

    दिनांक :15-Feb-2026
Total Views |
डॉ. श्रीपाद जोशी यांचे आक्षेप

यवतमाळ, 
होऊ घातलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत ज्यांना साहित्याची कोणतीही जाण नाही, अशा लोकांना अध्यक्षपद स्वतःकडे ठेवायचे आहे. प्रत्यक्षात मात्र, हे क्षेत्र राजकारणी किंवा व्यापाऱ्यांचे नाहीच. त्यामुळे या निवडणुकीत विदर्भ साहित्य संघ वाचविण्यासाठी ‘साहित्य संस्था वाचवा, विदर्भ साहित्य संघ वाचवा’ या पॅनेलखाली आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याची माहिती अध्यक्षपदाचे उमेदवार Dr. Shripad Joshi डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी रविवार, 15 फेब्रुवारी रोजी पत्रपरिषदेत दिली.
 
 
joshi
 
यावेळी सभासद डॉ. विलास देशपांडे, प्रमोद भुसारी, डॉ. विवेक विश्वरूपे, नितीन पखाले, सय्यद अमीन मुजफ्फर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. जोशी म्हणाले, या लोकांना साहित्य व भाषेबद्दल काहीच करायचे नाही. याचा डोळा फक्त संस्थेच्या जागेवर आहे.
एका राजकारणी, व्यवसायी व साहित्यबाह्य क्षेत्रातील अवाङ्मयीन व्यक्तीला, जी विदर्भ साहित्य संघाच्या कार्यात कधीही सक्रियदेखील राहिली नाही, विदर्भ साहित्य संघाची मालमत्ता व जागा सोपवली जावी, या हेतूने त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी त्यांना विदर्भ साहित्य संघासारख्या शंभर वर्षांच्या वाङ्मयीन, साहित्य संस्थेचा अध्यक्ष होण्याचा घाट घातला आहे, असे डॉ. जोशी यावेळी म्हणाले. खरे पाहिले तर साहित्य क्षेत्राची जाण असणाऱ्यांनी यात उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र, राजकारणी या क्षेत्रात येऊ पाहत आहेत. त्यामुळे मतदारांनी विवेकबुद्धीने मतदान केले पाहिजे, असे आवाहनसुद्धा यावेळी Dr. Shripad Joshi  डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले.