मुंबई
Imtiaz Ali २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या Laila Majnu या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक Imtiaz Ali यांनी क्लासिक प्रेमकथेचा आधुनिक आविष्कार सादर केला होता. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळूनही तो त्या वेळी बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नव्हता. मात्र, नंतर चित्रपटाच्या री-रिलीजदरम्यान त्याने लक्षणीय कमाई करत ‘कल्ट’ दर्जा मिळवला.
आता तब्बल आठ वर्षांनंतर इम्तियाज अली पुन्हा एकदा प्रेमकथेच्या विश्वात परतत आहेत. त्यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटाचे नाव ‘हीर रांझा’ असे आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला सुमारे ५० सेकंदांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये ‘लैला मजनू’मधील काही दृश्यांची झलक दाखवण्यात आली आहे आणि शेवटी ‘हीर रांझा’ हे शीर्षक उलगडते.
या नव्या प्रकल्पासाठी इम्तियाज अली यांची जोडी निर्माती Ekta Kapoor यांच्यासोबत जुळली आहे. दोघे मिळून एक रोमँटिक ड्रामा प्रेक्षकांसमोर आणणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. काही अहवालांनुसार ‘हीर रांझा’ हा ‘लैला मजनू’चा आध्यात्मिक सिक्वेल असू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. दोन्ही कथा भारतीय उपखंडातील अमर प्रेमकथांवर आधारित असल्याने कथानकाच्या धाग्यांमध्ये साम्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तथापि, ‘हीर रांझा’मधील कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याचे समजते. व्हिडिओ प्रदर्शित होताच ‘लैला मजनू’चे चाहते तो मोठ्या प्रमाणात शेअर करत असून, नव्या प्रेमकथेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.इम्तियाज अली यांची प्रेमकथा सादर करण्याची शैली आणि भावनिक कथनशैली प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे. त्यामुळे ‘हीर रांझा’च्या माध्यमातून ते पुन्हा एकदा प्रेम, विरह आणि नियतीची कहाणी मोठ्या पडद्यावर कशी उलगडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.