अखेर...तीस तासांनंतर बेपत्ता साहिलची कुटुंबीयांशी भेट

    दिनांक :15-Feb-2026
Total Views |
रिसोड,
missing-sahil-rathod : ट्युशनला जातो म्हणून साहिल राठोड हा सोळा वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. घरी परतला नसल्याने सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. रिसोड येथून शिर्डी बसमध्ये प्रवास करताना जवळ जास्त पैसे नसल्याने त्याला बसखाली उतरावे लागले. सुलतानपूर येथे उतरल्यानंतर वेदांत आश्रमातील महाराजांनी त्याला आश्रय दिला आणि कुटुंबीयांशी भेट घडवून आणली. तीस तास लोटल्यावर मुलगा भेटल्याने कुटुंब हरखून गेले. मूळचा विश्वी येथील रहिवासी असलेला साहिल काकाकडे रिसोड येथे तीन वर्षांचा असतानाच राहात आहे.
 
 
 
SAHIL
 
 
 
रिसोड येथे शिक्षक असलेले जानूसिंग बाळकिसन राठोड (वय ४७) यांच्याकडे त्यांचा धाकटा भाऊ संतोष राठोड यांचा मुलगा साहिल शिक्षणासाठी राहतो. सध्या तो दहावीत शिकतो. १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता त्याच्याकडे असलेली स्कुटी घेऊन क्लासला जातो म्हणून गेला. रात्री उशिरापर्यंत तो परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला असता त्याची स्कुटी बसस्टँडवरील नवनाथ रसवंतीसमोर उभी आढळली. त्याचा काही पत्ता लागला नाही. रात्रभर शोध घेतला असता तो सापडला नाही.
सकाळी बसस्टॅन्ड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता साहिल रिसोड डेपोच्या ताकतोडा बसमध्ये बसून गेल्याचे दिसून आले. तर सकाळी त्याच बसमधून उतरताना दिसून आला. याबाबत चालक वाघ यांना विचारले असता साहिल हा रात्रभर आमच्याजवळच झोपलेला होता व सकाळी पुन्हा तो त्याच बसमधून परत रिसोडला आला, असे चालक, वाहकांनी त्याच्या काकाला सांगितले.
 
 
दरम्यान, तो रिसोड ते शिर्डी बसमधून प्रवास करीत होता. तो सुलतानपूर (ता. मेहकर) येथे पोहोचला. बसमधून उतरताच त्याला वेदांत आश्रमाचे महंत भेटले. साहिलने त्यांना आवाज दिला व मला भूक लागली, असे सांगितले. महाराजांनी त्याला आश्रमात नेले. तेथे जेवू खाऊ घातले. विश्वासात घेऊन त्याला कुटुंबीयाबद्दल विचारले असता त्याने मौन बाळगले. काही वेळानंतर घराचा पत्ता व मोबाइल नंबर दिला. महाराजांनी घरच्यांशी संपर्क साधून साहिल सुखरूप माझ्याजवळ असल्याचे सांगितले. साहिलची भेट झाल्यावर घरच्यांच्या जीवात जीव आला. १२ तारखेच्या संध्याकाळी साडेपाच वाजता घरून गेलेला साहिल १३ तारखेच्या रात्री साडेअकरा वाजता परतला अन् घरच्यांना मिळाला.