एप्रिलमध्ये पुणे मेट्रो सुरू होईल की फक्त अपेक्षा?

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर काम अजूनही संथ

    दिनांक :15-Feb-2026
Total Views |
पुणे
Pune Metro पुणे आयटी सिटी मेट्रोच्या माध्यमातून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा होती; मात्र सध्याच्या कामाच्या गतीवरून एप्रिलमध्ये मेट्रो सेवा सुरू होईल की नाही, हे प्रश्‍नचिन्ह बनले आहे. जिल्हा न्यायालय ते बालेवाडी स्टेडियमदरम्यान अनेक मेट्रो स्थानकांवरील कामे अजूनही संथ गतीने सुरू आहेत.
 

Pune Metro Hinjewadi–Shivajinagar corridor 
विशेषतः जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, कृषी महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ‘यशदा’ आणि कृषी अनुसंधान स्थानकांवर कामे अजूनही अपूर्ण आहेत. या स्थानकांवर कॉन्कोर्स, लिफ्ट-एस्कलेटर बसविणे, तिकिटिंग प्रणाली, सुरक्षा चाचण्या, अग्निशमन यंत्रणा इत्यादी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रवाशांना एप्रिलमध्ये मेट्रो सेवा सुरू होईल की एप्रिल फूल ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांनी सांगितले की, मेट्रो सुरू करण्यासाठी आणखी मुदतवाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या प्रकल्पाचे काम पीपीपी तत्त्वावर पुणे आयटी सिटी मेट्रो या कंपनीला दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चअखेरपर्यंत मेट्रो मार्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते, परंतु कामाची प्रत्यक्ष गती पाहता, एप्रिलमध्ये सेवा सुरू होणे कठीण दिसते.
 
 
सध्या ज्या मेट्रो स्थानकांवर Pune Metro मोठ्या प्रमाणात काम शिल्लक आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कामगार काम करत आहेत, तसेच जिने व लिफ्ट जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. तरीही, या कामाला अजून काही महिने लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार, शिल्लक राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी किमान चार ते पाच महिने लागतील.दुसरीकडे, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील लाखो कर्मचाऱ्यांना या मार्गाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होईल, अशी आशा आहे. मात्र सध्याच्या स्थितीवरून पाहता, एप्रिलमध्ये मेट्रो सेवा सुरू होईल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पीएमआरडीए प्रशासनाकडून एप्रिलमध्ये सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्ष कामाची स्थिती वेगळी आहे.
पुणेकरांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, सरकारी आदेश असूनही कामाची गती वाढलेली दिसत नसल्याने, मेट्रो मार्गाच्या सुरुवातीस आणखी थोडा वेळ लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रवाशांची धास्ती आणि अपेक्षा दोन्ही या प्रकल्पाभोवती अद्याप तितकीच तळमळ दाखवत आहेत.