खासदार बोंडे यांचे प्रयत्न फळाला
अन्य परीक्षांमुळे होती मागणी
अमरावती,
Anil Bonde महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) भरती प्रक्रियेतील परीक्षा केंद्र व दिनांक नियोजनाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. खासदार अनिल बोंडे यांनी ही बाब परीक्षार्थींच्या विनंतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी दखल घेऊन मजीप्राला निर्देश दिले. त्यानुसार २५,२६,२७ फेब्रुवारीच्या सदर परीक्षा पुढे लढकलण्याचा निर्णय मजीप्राने घेतला आहे. पुढील तारखा निश्चित झाल्यावर कळविण्यात येणार असल्याचे मजीप्राचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव यांनी कळविले आहे.
Anil Bonde मजीप्रा भरती प्रक्रिया आयबीपीएसमार्फत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षा केंद्रांचे वाटप व परीक्षा दिनांकांच्या नियोजनामध्ये अनेक गंभीर अडचणी विद्यार्थ्यांनी खा. बोंडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. विद्यार्थ्यांच्या निवेदनानुसार, फेब्रुवारीत विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय महत्त्वाच्या परीक्षांचे दिनांक एकाच दिवशी येत आहेत. त्यामध्ये रेल्वे भरती परीक्षा २५ फेब्रुवारी, इसरो व्हीएसएससी परीक्षा २६ फेब्रुवारी, नाशिक महानगरपालिका परीक्षा २४ व २९ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परीक्षा २५, २६ व २७ फेब्रुवारी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (कौशल्य चाचणी) २६ व २७ फेब्रुवारीला आहे. अशा अनेक परीक्षांचे वेळापत्रक जवळजवळ एकाच कालावधीत आल्यामुळे उमेदवारांपुढे गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना एकाच दिवशी किंवा सलग दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा द्याव्या लागत असून, परीक्षा निवडीचा कठीण निर्णय घ्यावा लागत आहे. अनेक उमेदवारांनी विविध संस्थांच्या परीक्षांसाठी अर्ज केलेले असल्याने दिनांकांच्या संघर्षामुळे त्यांना समान संधी मिळत नाही. याचा थेट परिणाम स्पर्धा परीक्षेच्या पारदर्शकतेवर व गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे. दूरवरच्या परीक्षा केंद्रांमुळे प्रवास, निवास, आर्थिक खर्च व मानसिक ताण यामध्ये मोठी वाढ होत आहे. ही भरती प्रक्रिया हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असल्याने त्यामध्ये न्याय्य, सुयोग्य व विद्यार्थीहिताचा दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार खा. बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. त्याची दखल घेऊन मजीप्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. महापारेषण व मजीप्रा परीक्षेसंदर्भातल्या अन्य काही अडणींवर चर्चा करण्यासाठी खा. बोंडे बुधवारी मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटणार आहे.