कानपूर,
Commission agent commits suicide in Kanpur उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील काकादेव परिसरात एका ३७ वर्षीय कमिशन एजंटने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शास्त्रीनगर, मतैयापुरवा येथील रहिवासी रवी यादव असे मृताचे नाव असून तो दुचाकी, कार आणि पिकअप वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार कमिशनवर करत होता. त्याच्या पश्चात पत्नी दीपिका, दोन मुले आणि आई मानती देवी असा परिवार आहे. घटनेनंतर पोलिसांना रवीच्या कपड्यांतून पाच पानांची सविस्तर चिठ्ठी सापडली. त्या पत्रात त्याने “मला मरायचे नव्हते, पण विश्वासघात आणि कर्जाच्या ओझ्याने मला हा निर्णय घ्यावा लागला,” असा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. आपल्या मृत्यूसाठी त्याने युवराज यादव आणि त्याचा भाऊ संतोष यादव यांना जबाबदार धरले आहे.
पत्रातील मजकुरानुसार, रवीने जानेवारी महिन्यात युवराजला दहा लाख रुपये रोख दिले होते. दोघे मिळून वाहने खरेदी करून नफा वाटून घेण्याचे ठरले होते. मात्र, व्यवहारातून मिळालेली रक्कम परत न देता फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. काही गाड्यांचे वित्तपुरवठे रवी आणि त्याचा मित्र रवी कुमार यांच्या नावावर करण्यात आले, परंतु कर्जाची रक्कम युवराजच्या खात्यात वळवण्यात आली, असा आरोपही चिठ्ठीत नमूद आहे. त्यामुळे रवीवर मोठे आर्थिक ओझे आले आणि ज्यांच्याकडून पैसे उधार घेतले होते त्यांच्याकडून सतत तगादा आणि धमक्या येत असल्याने तो मानसिक तणावात होता, असे कुटुंबीयांनी सांगितले
रवीचा भाऊ पंकजने सांगितले की, तो काही दिवसांपासून चिंताग्रस्त होता, परंतु त्याने कुटुंबासमोर मन मोकळे केले नव्हते. व्यवहारातील रक्कम न मिळाल्याने आणि वाढत्या कर्जामुळे तो खचला होता. आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. काकादेव पोलिस ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, सापडलेल्या पत्राची शहानिशा केली जात असून कुटुंबाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व आरोपांची पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.