भारतीय हवाई दलाला मिळणार स्वदेशी ॲडव्हान्स्ड फायटर जेट

एएमसीए प्रोटोटाइप मंजूर

    दिनांक :17-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Indigenous Advanced Fighter Jet भारताने स्वदेशी स्टील्थ फायटर जेट प्रकल्पात महत्वाचा टप्पा पार केला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आपल्या पाचव्या पिढीतील ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) प्रोटोटाइपसाठी सहा कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्यांमध्ये टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स, लार्सन अँड टुब्रो, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत फोर्ज, भारत अर्थ मूव्हर्स आणि डेटा पॅटर्नचा समावेश आहे.
 
 

फाइटर जेट प्रोजेक्ट 
हा स्वदेशी फायटर जेट एकल-सीट, ट्विन-इंजिन आणि मल्टीरोल क्षमता असलेला विमान असेल. यामध्ये प्रगत स्टील्थ कोटिंग, अंतर्गत शस्त्र प्रणाली आणि पुढील पिढीतील एव्हियोनिक्स असतील, ज्यामुळे शत्रूच्या आधुनिक रडारला हा शोध घेता येणार नाही. भारतीय हवाई दलाला २०३५ नंतर एएमसीए मिळेल, आणि सुरक्षेच्या गरजांसाठी १२५ हून अधिक विमाने तयार केली जातील. या प्रकल्पामुळे भारत पाचव्या पिढीतील स्टील्थ तंत्रज्ञानाचा मालक असलेला जगातील चौथा देश बनेल. अमेरिकन एफ-२२, एफ-३५, रशियन एसयू-५७ आणि चिनी जे-२० यांसारख्या पाचव्या पिढीच्या विमानांमध्ये भारतही सामील होईल.
 
डीआरडीओने निवडलेल्या कंपन्यांना प्रोटोटाइप तयार करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. प्रोटोटाइप तयार झाल्यानंतर अंतिम उत्पादनासाठी कंपनीची निवड केली जाईल. तथापि, सरकारी मालकीची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) प्रोटोटाइपच्या कागदपत्रांतील त्रुटीमुळे या टप्प्यातून वगळण्यात आली आहे. हा प्रकल्प भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी आणि स्वदेशी विमानसैनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मोठा टप्पा ठरेल.