अमरावती परिमंडळात लागले ३ लाख स्मार्ट मीटर

    दिनांक :17-Feb-2026
Total Views |
महावितरणची मोहीम जोरात
अमरावती, 
Smart meter ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे स्मार्ट मीटर अमरावती परिमंडळात जवळपास ३ लाख ग्राहकांकडे बसविण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत महावितरणच्या अमरावती परिमंडळात २ लाख ९९ हजार ९१५ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १ लाख ८० हजार १९३ आणि यवतमाळ जिल्ह्यात १ लाख १९ हजार ७२२ स्मार्ट मीटरचा समावेश आहे.
 
dksl
 
Smart meter शंभर टक्के अचूक बिल, ग्राहकांना दर तासाला मोबाईलवर विजेचा वापर समजण्याची सुविधा, सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे व विजेचा वापर नियंत्रणात ठेवण्याची संधी, असे अनेक लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रती युनिट ८० पैसे टीओडी सवलतही देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी वीजदरात सवलत देण्यात येत आहे. राज्यात ९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. स्मार्ट मीटर बसविण्याच्या उपरोक्त आकडेवारी १० फेब्रुवारीपर्यंतची आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनी मोबाईल फोनमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून त्यामध्ये आपला वीजवापर नियमित तपासावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजदरात वाढ होईल, असाही एक गैरसमज निर्माण झाला होता. तथापि, राज्यात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केल्यानंतर महावितरणने पंचवार्षिक वीजदर निश्चितीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत वीजदर कमी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्ट मीटर मोफत मिळण्यासोबतच त्याचा अप्रत्यक्ष बोजाही पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.