सूर्यग्रहण आणि धार्मिक मान्यता

    दिनांक :17-Feb-2026
Total Views |
वेध
 
पुंडलिक आंबटकर
solar eclipse चंद्र अथवा सूर्याला ग्रहण लागणे या खगोलीय घटना असतात. परंतु, ग्रहणांबाबत काही धार्मिक मान्यतासुद्धा आहेत. जीवसृष्टी पंचतत्त्वांनी बनलेली आहे. त्यामुळे ग्रहणांचा परिणाम जीवसृष्टीवर होतो. 2026 मध्ये दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अनुभवता येणार आहे. यातील तीन ग्रहणे भारतातून दिसणार नसली तरी 3 मार्च रोजीचे खग्रास चंद्रग्रहण आपल्याला पाहता येणार आहे. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्याने दृष्टी गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आवश्यक सुविधा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.
 
 
 
surygrahan
 
 
 
17 फेब्रुवारी रोजी यंदाचे पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. ही एक खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात अशा घटनेला राहू-केतुमुळे निर्माण होणारी अशुभ घटना मानले जाते. या काळात अन्न आणि पाणी ग्रहण अथवा कुठलेही शुभकार्य वर्ज्य असते. कारण, ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. या काळात मंदिरे बंद ठेवली जातात. परंतु, 17 फेब्रुवारीचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने वेधादी नियम पाळण्याची गरज नसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केलेले आहेत. जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या अगदी मधोमध चंद्र येतो तेव्हा सूर्याला ग्रहण लागते. ही घटना अमावास्येला घडते. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आल्याने सूर्य झाकला जातो आणि याच घटनेला सूर्यग्रहण म्हणून ओळखले जाते. जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्राला ग्रहण लागते. भारतात अशा घटनांना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या काळात मंत्रजप, ध्यान किंवा दानधर्म केला जातो. सूर्यग्रहणाच्या काळात झोप घेणे निषिद्ध मानले जाते. कारण, या काळात वातावरणात हानिकारक किरणे पसरतात. ग्रहणकाळात झोप घेतल्याने पचनसंस्था बिघडण्याची शक्यता असते.
 
2026 मध्ये एकूण चार ग्रहणे लागतील. यात दोन सूर्यग्रहणे तर दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे. 17 फेब्रुवारी रोजी लागणारे सूर्यग्रहण रिंग ऑफ फायर अर्थात कंकणाकृती स्वरूपाचे असेल. हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्टिका, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात दिसेल. हे सूर्यग्रहण दुपारी 3.26 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 7.57 पर्यंत त्याचा प्रभाव राहील. त्यानंतर 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण खग्रास स्वरूपाचे अर्थातच पूर्ण चंद्राला लागेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून सायंकाळी 6.27 सुरू होईल आणि त्याचा प्रभाव 7.53 वाजेपर्यंत राहील. हे ग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या औचित्यावर येत असल्याने होळी साजरी करण्यासाठी पंचांगाचा आधार घेण्याबाबत जाणकारांकडून सांगितले जात आहे. यानंतर 12 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा सूर्याला ग्रहण लागणार आहे. हे सूर्यग्रहण खग्रास स्वरूपाचे असल्याने संपूर्ण सूर्य झाकला जाईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने वेधादी नियम पाळण्याची गरज नाही. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी यंदाचे दुसरे चंद्रग्रहण लागेल. हे ग्रहण खंडग्रास स्वरूपाचे असून ते अमेरिका, आफ्रिका आणि युरोपात दिसेल.
 
खरे तर ब्रह्मांडात अशा असंख्य घटना रोजच घडतात. परंतु, मनुष्य जगताशी त्यांचा संबंध येत नाही. आपण ज्या आकाशगंगेत राहतो तिला मिल्की वे अर्थातच मंदाकिनी म्हणून ओळखले जाते आणि आपल्या आकाशगंगेचा व्याप 1 लाख प्रकाश वर्षे अंतरात आहे. 1 लाख प्रकाश वर्षे म्हणजे प्रकाश 1 लाख वर्षात जितका प्रवास करेल, तितके अंतर होय. प्रकाशाचा वेग प्रतिसेकंद 3 लाख किलोमीटर इतका आहे. सूर्य पृथ्वीपासून 14 कोटी 96 लाख किलोमीटर अंतरावर आहे. व्यासाचा विचार केला तर सूर्य पृथ्वीपेक्षा 109 पट मोठा आहे आणि त्यात 13 लाख पृथ्वी सामावू शकतात. सूर्यमालेच्या एकूण वस्तुमानापैकी एकट्या सूर्याचे वस्तुमान तब्बल 99.86 टक्के इतके आहे आणि तरीही चंद्रासारखा किरकोळ ग्रह आडवा आल्याने सूर्याला ग्रहण लागते! खरे तर सूर्याला ग्रहण लागतच नाही! फक्त चंद्र आडवा आल्याने सूर्य आपल्याला दिसत नाही, एवढीच ही खगोलीय घटना असते.
 
आपल्या सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्युन असे एकूण आठ प्रमुख ग्रह आणि अनेक उपग्रह आहेत. प्लुटोला 2006 पूर्वी नववा ग्रह मानले जात होते. परंतु, त्याला शास्त्रज्ञांनी आता बटू ग्रह म्हणून वर्गीकृत केले आहे. ग्रहण फक्त पृथ्वीवरच अनुभवास येत नाही.solar eclipse तर ज्या मुख्य ग्रहांचे चंद्र ठरावीक कालावधीत सूर्यासमोर येतात तेव्हा त्या ग्रहांवरूनसुद्धा ग्रहणाचा अनुभव येतो. ब्रह्मांड गतिमान असल्याने या घटना घडतात आणि अशा घटनांचे जीवसृष्टीत मोठे योगदान आहे.
9881716027