अग्रलेख
harshavardhan sapkal 2007 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यावेळी सोहराबुद्दीन चकमक आणि गुजरात दंगलीचे मुद्दे प्रचारात जोरात उचलले जात होते. नागरिकांच्या धार्मिक भावना चेतविण्यासाठी आणि अल्पसंख्यकांची मते आपल्या झोळीत पडावीत यासाठी काँग्रेसचे पुढारी भारतीय जनता पक्ष आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत होते. 1 डिसेंबर 2007 रोजी गुजरातमधील एका प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांना, सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे संबोधले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसचे नेते गदगद झाले. नरेंद्र मोदींचे राजकीय जीवन आता संपलेच समजा, अशा स्वप्नात ते रमले होते. अशा प्रकारची जहाल आणि समाजात भेद निर्माण करणारी विधाने केल्याने आपल्याला राजकीय फायदा होईल, अशी अटकळ काँग्रेस नेत्यांनी बांधली असावी; पण झाले उलटेच! मोदींना ‘मौत का सौदागर’ संबोधणे काँग्रेसच्या चांगलेच अंगलट आले. सोनिया गांधी यांच्या या विधानाचा फायदा होण्याऐवजी काँग्रेसलाच मोठा फटका बसला. भारतीय जनता पक्ष 117 जागा घेत पुन्हा सत्तेवर आला तर काँग्रेसला फक्त 59 जागा मिळाल्या. मोदी पुन्हा एकदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले.
मोदींना शिव्याशाप देण्याची ही परंपरा 2007 पासून सुरू झाली, ती हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत आजतागायत सुरू आहे. हिंदूंना डिवचणे, त्यांच्या श्रद्धास्थानांचा मुद्दाम अपमान करण्यात काँग्रेसला एक वेगळेच मानसिक समाधान मिळत असल्याचे दिसून येते. बरं, अशी विधाने करणारी नेतेमंडळी काही नवखे कार्यकर्ते नाहीत. सोनिया गांधी, दिग्विजयसिंह, राहुल गांधी, जयराम रमेश, मल्लिकार्जुन खडगे, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन सपकाळ हे अनुभवी, ज्येष्ठ आणि मोठ्या पदावरील नेते आहेत. समाज त्यांच्याकडे आशेने पाहतो. पण, याच नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रसातळाला नेण्याचे काम केले आहे. 2014 नंतर केंद्रात काँग्रेस पक्ष सातत्याने पराभूत होत आला आहे. पण, हिंदू धर्माला शिव्या देण्यात, हिणवण्यात काँग्रेसचे नेते धन्यता मानत आलेले आहेत. 2014 नंतर या देशातील राजकीय आणि सामाजिक समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. युवावर्ग जागृत झाला असून हिंदू धर्माला शिव्या देत सत्तेवर येण्याचे दिवस आता संपले आहेत. गुजरात दंगल का घडली, हे सर्वांना माहीत असताना त्यासाठी नरेंद्र मोदींना जबाबदार ठरविण्याचे सारे प्रयत्न काँग्रेसने करून पाहिले. केंद्रात सत्तेवर असताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे खच्चीकरण करण्याचा कटही आखला गेला होता. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने मोदी-शाह यांना सर्वच आरोपातून मुक्त केले.
वास्तविक पाहता कारसेवा करून परत येणाऱ्या रामभक्तांवर गोधरा रेल्वे स्थानकावर हल्ला करून त्यांना जाळून ठार केल्यानंतरची प्रतिक्रिया म्हणजे गुजरात दंगल होती. कारण, गुजरातचा इतिहास पाहता तेथे हिंदू सातत्याने मार खात आला होता. सुरत, अहमदाबाद येथे तर सातत्याने जातीय दंगली व्हायच्या. कारण, दंगलखोरांना काँग्रेस सरकार पाठीशी घालत होते, पण गोधरा जळीत कांड हा हिंदूंच्या संयमाचा अंत होता. दुर्दैवाने काँग्रेस आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी पुढारी गुजरात जातीय दंगलीचा उल्लेख वारंवार करतात; पण गोधरा जळीत कांड सोईस्करपणे विसरतात किंवा त्याचा उल्लेख करायचे टाळतात. काँग्रेसचे वर्तमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी पंतप्रधान मोदींना विषारी साप संबोधले होते. या विधानावर सडकून टीका झाली; पण, भाजपच्या द्वेषाने पछाडलेल्या काँग्रेस नेत्यांवर याचा काहीच फरक पडत नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीवरून पंतप्रधान मोदींवर टीका करताना ‘चौकीदार चोर है’ असे म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले होते आणि त्यांना याबद्दल माफीही मागावी लागली होती. ‘काँग्रेसने माझा 91 वेळा शिवराळ भाषेत उल्लेख केला,’ असे खुद्द पंतप्रधान मोदींनी 2023 मध्ये कर्नाटकमधील एका सभेत सांगितले होते. असाच ‘प्रताप’ आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याबाबतीत अपशब्द उच्चारणे अथवा त्यांची तुलना एखाद्या रक्तपिपासू आणि धर्मवेड्या शासकासोबत करणे कोणताही स्वाभिमानी आणि शिवप्रेमी खपवून घेणार नाही. हे सर्व काही माहीत असताना काही लोक धर्मांध आणि जातीयवादी जगाच्या इतिहासातील सर्वांत क्रूर आणि धर्मवेडा बादशहा औरंगजेब आणि म्हैसूरचा शासक टिपू सुलतानचे उदात्तीकरण करीत असतात याचे आश्चर्य वाटते. मुस्लिमबहुल मालेगाव येथे इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्षाने सत्ता स्थापन केली. उपमहापौरांच्या दालनात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अथवा अन्य महान विभूतींची छायाचित्रे लावण्याऐवजी मुद्दाम धर्मांध वृत्तीचे प्रदर्शन करीत क्रूरकर्मा म्हैसूरचा शासक टिपू सुलतानचे छायाचित्र लावले गेले. भारतीय जनता पक्षासह हिंदुत्ववादी संघटनांनी टिपूच्या छायाचित्राला विरोध दर्शविला. वाढता विरोध पाहता आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून टिपूचे छायाचित्र हटविण्यात आले. टिपूवरून निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती निवळत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपूची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा करंटेपणा केला. ‘शौर्याच्या बाबतीत टिपूला शिवाजी महाराजांच्या बरोबरीने समजले पाहिजे आणि त्याने कोणत्याही विखारी आणि विषारी विचारांना जवळ केले नाही,’ असा अफलातून शोध सपकाळांनी लावला. मलबार आणि कुर्ग भागातील हजारो हिंदू नागरिकांना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडणारा आणि ज्यांनी नकार दिला त्यांची कत्तल करणारा टिपू सुलतान सपकाळांना कोणत्या मापदंडाने सर्व धर्मीयांचा आदर करणारा शासक वाटत असावा?
साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाणे आणि सामाजिक सौहार्द जपले जाईल, असे वर्तन आणि व्यवहार करणे हे मोठ्या पदावरील नेत्याकडून अपेक्षित असते. पण, सपकाळ यांना याचे भान राहिले नाही अथवा मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी त्यांनी हेतुपूर्वक हे विधान केले असावे. शककर्ते शिवराय आणि हिंदूंची कत्तल करणारा, धर्मपरिवर्तन करणारा टिपू सुलतान यांची कशी बरोबरी होऊ शकते, याची जाण त्यांना नसावी? टिपूने मलबार आणि कुर्ग भागात हजारो हिंदू नागरिकांचे बळजबरीने धर्मांतर केल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. विशेषत: नायर आणि कोडवा या हिंदू समुदायातील हजारो नागरिकांना अटक करून त्यांना श्रीरंगपट्टण येथे आणले आणि त्यांचे बळजबरीने धर्मांतर केले. टिपूचा बाप हैदरअली हा सुद्धा गद्दार होता. म्हैसूरवर वोडियार घराण्यातील राजे राज्य करीत होते. हैदरने बेईमानी आणि दगाबाजीने म्हैसूरचे राजा कृष्णराज वोडियार आणि पंतप्रधानाला कैद करीत सत्ता हस्तगत केली होती. अशा या बेईमान आणि तुच्छ सरदाराचा टिपू हा पुत्र होता. त्यामुळे, टिनपाट, धर्मांध, क्रूर आणि रक्तपिपासू टिपूची तुलना शिवरायांसोबत करून सपकाळांनी काँग्रेसवाले राजकारण आणि मतांसाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद राज्यभर उमटत आहेत. शिवप्रेमी संतप्त झाले असून राज्यात ठिकठिकाणी सपकाळांविरोधात आंदोलन सुरू झाले आहे. एवढे होऊनही सपकाळ महाशय यांनी अजूनही माफी मागितली नाही किंवा साधा खेदही व्यक्त केला नाही.harshavardhan sapkal उलट, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही शिवरायांचा अवमान केल्याचे उदाहरण देत, मीच कसा बरोबर आहे, हे सांगण्याचा प्रयत्न सपकाळ करीत आहेत. सपकाळांचा हा प्रताप हिंदू समाजाने अजिबात सहन करू नये. काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या या कृतीचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. तो जितका जोरात होईल, तेवढी अशा पिलावळीची हिंमत खचेल, हे समस्त हिंदू समाजाने लक्षात ठेवले पाहिजे.