अजितदादांच्या अपघात की घातपात? फडणवीस लिहणार केंद्राला पत्र!

18 Feb 2026 11:45:59
मुंबई,
Ajitdada's accident or mishap अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून या घटनेभोवती विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा केवळ अपघात होता की यामागे घातपाताचा संशय आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. दुर्घटनेतील उड्डाण नोंद यंत्रातील माहिती समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना ते यंत्र जळाल्याच्या दाव्यांमुळे संभ्रम अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. या पत्राद्वारे दुर्घटनेची सखोल चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
 

Ajitdada accident 
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही स्वतंत्र आणि व्यापक चौकशीची मागणी केली आहे. मंगळवारी पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांची भेट घेत निवेदन सादर केले. या भेटीत प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ तसेच पार्थ पवार यांची उपस्थिती होती.भेटीनंतर तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दुर्घटनेच्या दिवशी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री घटनास्थळी उपस्थित होते आणि केंद्र सरकारने स्वायत्त तपास यंत्रणा नेमल्याचे जाहीर केले आहे. तरीही, अधिक व्यापक आणि सखोल चौकशी व्हावी, यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तपास सोपविण्याची मागणी करण्यात आली आहे. विविध मुद्द्यांची पडताळणी होऊन अंतिम निष्कर्ष राज्यातील तसेच देशातील जनतेसमोर यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत योग्य त्या पावलांची हमी दिल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाबाबतच्या हालचालींना वेग आला असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0