अमरावती,
Amravati University संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ श्री संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीत नमूद संदेशाप्रमाणे केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा ‘श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार २०२५’ जाहीर झाला असून गुरूवार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह येथे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने स्व. द. ना. उपाख्य बबनराव मेटकर यांचेकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ ‘श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार - २०२५’ यावर्षी संस्था गटातून दिव्या फाऊंडेशन, वरवंड, जि. बुलढाणा या सामाजिक संस्थेला, तर व्यक्ती गटातून अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते मनीष रमेशराव पावडे यांना घोषित झाला आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. Amravati University पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व दानदात्यांचे प्रतिनिधी तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही. एम. मेटकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्य, विद्यापीठ प्राधिकारणींचे सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी तसेच समाजसेवक, शहरातील गणमान्य नागरिक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले आहे.