​"छत्रपतींची तुलना टिपूशी करणाऱ्यांचा महाराष्ट्रात आत्मविश्वास वाढतोच कसा?" - शरद पोंक्षे यांचा तिखट सवाल

18 Feb 2026 11:24:16
आर्वी,
'छत्रपतींचे विचार आचरणात आणणे हीच खरी शिवजयंती'; आर्वीत शरद पोंक्षे यांचे कडाडते व्याख्यान
sharad ponkshes आर्वी येथील शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित विशेष व्याख्यानात प्रसिद्ध अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी आपल्या धारदार वाणीने आर्वीकरांना मंत्रमुग्ध केले. "छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जयजयकार करून चालणार नाही, तर त्यांचे गुण आणि व्यवस्थापन कौशल्य स्वतःच्या आयुष्यात उतरवणे हीच खरी शिवजयंती ठरेल," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. समितीचे अध्यक्ष पवन ढोले यांनी पोंक्षे यांचे स्वागत केले, तर विवेक उर्फ नंदू वैद्य यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली.
 
 
शरद पोंक्षे
 
 
 
यावेळी बोलताना पोंक्षे यांनी वर्तमानातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर प्रखर भाष्य केले. "आज महाराष्ट्रात धर्माचे आणि जातीचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, ते पाहून अस्वस्थ व्हायला होते. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसारख्या व्यक्तींशी केली जाते, हे दुर्दैवी आहे. ज्या भूमीत शिवराय जन्माला आले, तिथे अशा प्रवृत्तींना आत्मविश्वास मिळतोच कसा?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात शिवरायांचा वारसा जपताना हिंदू समाजाने केवळ निषेध नोंदवून शांत न बसता, आपल्या दैवताचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध सनदशीर मार्गाने ठाम उभे राहिले पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
व्याख्यानात पोंक्षे यांनी 'सेक्युलरिझम' आणि 'सनातन धर्म' यावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "हीन भावना दूर ठेवणारा तो खरा हिंदू. आपण आज ताठ मानेने जगत आहोत, ते केवळ छत्रपतींमुळेच. माता जिजाऊंनी शिवरायांना रामायण-महाभारताचे, श्रीराम - श्रीकृष्णांचे संस्कार दिले, तेच संस्कार आज आपण आपल्या मुलांवर बिंबवले तरच प्रत्येक घरात शिवरायांचे प्रतिबिंब दिसेल." हा संघर्ष केवळ हिंदू-मुस्लिम असा नाहीच आहे, तो माणुसकी मानणारे आणि क्रूरता जोपासणारे यांच्यातील 'धर्म-अधर्म' युद्ध असल्याचे त्यांनी ऐतिहासिक दाखल्यांसह स्पष्ट केले. तसेच, शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यासाठी समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुधीर दिवे यांनी शिवराय जन्मोत्सव समितीच्या उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले की, "आजकाल उत्सवांचे स्वरूप बदलत असताना आर्वीतील तरुणांनी रोगनिदान शिबिर आणि प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करून एक आदर्श पायंडा पाडला आहे. अशा विधायक कामांमुळेच शिवरायांचा विचार जिवंत राहील." यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, विवेक बिंड, विनय देशपांडे, अनिल जोशी यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने आर्वीकर नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शरद पोंक्षे यांनी महाराजांचे युद्धकौशल्य, गनिमी कावा आणि अष्टप्रधान मंडळाच्या व्यवस्थापन शास्त्रावर सविस्तर विवेचन केले. त्यांच्या शैलीदार संवादफेकीने उपस्थित श्रोते भारावून गेले होते. कार्यक्रमाची सांगता अंकुश झाडे यांनी सादर केलेल्या स्वरचित कवितेने झाली.sharad ponkshes संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके संचालन आणि आभार प्रदर्शन किशोर राऊत यांनी केले. या सोहळ्याने आर्वीतील शिवजयंती उत्सवात एक नवा वैचारिक उत्साह भरला आहे.
Powered By Sangraha 9.0