वेध
baby selling case आज आम्हाला आपल्या ‘स्व’चा विसर पडला आहे. म्हणजे स्वतःचे कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरत चाललो आहोत. म्हणूनच जे आपल्याशी सुसंगत नाही, त्याची ‘संगत’ वाढली अन् नीतीमुल्यांचा ऱ्हास झाल्यागत आपण वागू लागलो आहोत. दिवसागणिक नवनवीन पण मन सुन्न करणारे प्रकार पूढे येत आहेत. डॉक्टर आमच्यासाठी देवचं ना, पण तोच जीवाचा बाजार मांडत असेल आणि या बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढून जीवांची बोली लागत असेल तर ‘पांढऱ्या’ कोटातील ‘काळा’ कारभार नैतीक अधःपतन नव्हे का?

नीती, मुल्ये, समाजभान आणि सामाजिक दायीत्व या गोष्टी गाठोड्यात बांधल्या गेल्या आहेत. मी, माझं आणि माझ्यासाठी ऐवढ्याच विश्वात स्वतःच समाधान शोधणारी मानसिकता बोकाळत चालली आहे. मगं हे सर्व करताना पैसा हा प्रत्येकाची कमजोर होऊन बसला आहे. पैसा मिळविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयार अनेकांची असते, अन् त्याचा प्रत्ययही अनेकदा येतो. मात्र हे करताना आपण आपल्या ‘स्व’ ला गहाण ठेवतो, याचे भानच कूणाला नाही. माझी जबाबदारी काय? मी ज्या पेशात आहे, त्याचे कर्तव्य कोणते? त्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे? हे आर्थिक स्वार्थापूढे विसरलो आणि नीती मूल्यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली.
खरं तर वैद्यकीय क्षेत्र म्हणजे पवित्र! डॉक्टर म्हणजे आम्हा प्रत्येकासाठी देवापेक्षा कमी नाही, कारण ते हात अनेकांचे जीव वाचवितात. मोठ्या विश्वासाने आम्ही आमच्या जीवापाड जपत असलेल्या लोकांना उपचारासाठी डॉक्टरांच्या सुपूर्द करतो. यामागे असतो, तो केवळ आणि केवळ डॉक्टरांवरील विश्वास! पण आज हा विश्वास किती ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या क्षेत्रातील काही महाभागांचे प्रताप वैद्यकीय क्षेत्रालाही नासवीत आहे. चार दोन लोकांच्या कृतीने खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे आपले कर्तव्य वहन करणाऱ्या डॉक्टरांनाही खाली पाहण्याची वेळ येते, तेव्हा नैतिक अधःपतन झाल्याची जाणीव होते.
भंडारा जिल्हयात सध्या चांगलेच चर्चेत असलेले बाळ विक्री प्रकरण तर डॉक्टरांवरील विश्वास क्षणात संपविणारे आहे. उपचाराच्या नावाखाली रुग्णायात ठेवीत असल्याचे सांगून चक्क लाखो रुपयात एका नवजात चिमुकलीचा ‘सौदा’ करुन स्वतःच्या घरात आर्थिक संपन्नता आणण्याचा प्रयत्न करणारा डॉक्टर खरचं डॉक्टर म्हणविण्याचा योग्यतेचा आहे का? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्या हातानी जीव वाचवायचे, तेच हात जीव विकू लागले तर हा मांडलेला जीवाचा बाजार विकृत मानसिकतेचे दर्शन घडविणाराच आहे. जागतिक स्तरावर सुद्धा मुलांची विक्री हा अतिशय गंभीर आणि अमानविय गुन्हा मानला जातो. पण हे जर सुशिक्षीत मानवी मनाला समजत नसेल, तर हे बाजार भविष्यात व्यापक स्वरुपाचे होतील, हे तेवढेच खरे!
कूणाच्या तरी परिस्थितीचा फायदा घेत, स्वतःचा स्वार्थ साधायचा. हे करताना आपले कर्तव्य, आपल्या व्यवसायातील नैतिकता विकून टाकल्यागत वागायचे, याचे समर्थन होऊच शकत नाही? वैद्यकीय व्यवसायातील नीतिमत्ता पायदळी तुडविण्याचा हा प्रकार विविधांगांनी विचार करण्यास भाग पाडणारा आहे. अशावेळी डॉक्टरांचे दवाखाने म्हणजे बाळ विक्रीचा सुरक्षित अड्डा म्हणायचा का? हा प्रश्न पडतो. एक डॉक्टर असे करत असेल, तर ही नक्कीच त्याच्या वैद्यकीय व्यवसायाशी केलेली प्रतारणा आहे. पण मगं अशा मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या समाजाचाही विचार व्हायला हवा! मुलांची विक्री हा प्रकार अवैध दत्तक विधान म्हणूनही पाहिला जातो. पण जे नियमानूसार नाही, ज्यासाठी ‘त्या’ जीवांची बोली लागते, ते चूकीचेच आहे. याची जाणीव असातानाही मूलांची खरेदी करण्याची चूक करण्याचे धाडस का? होते हा प्रश्नच आहे. डॉक्टरांनी जरी असा बाजार मांडला, तरी त्या बाजारात जाऊन व्यवहार करायचे की नाही, याचे तारतम्य या सौदबाजीत सहभागी होणाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. आज मुलं न होणे ही समस्या वाढताना दिसते. याची अनेक कारणेही असतील. पण मगं पैसे देऊन विकत घेतलेल्या मूलांमध्ये आपण खरा आनंद शोधू शकतो का? वस्तूंच्या बाजारातून एखादी गोष्ट विकत आणल्यानंतर त्याबद्दल किती आत्मियता आणि जिव्हाळा आम्हाला असतो, हे सर्वश्रुत आहे. तेवढ्यापूरते असलेले कौतूक नंतर आटू लागते.baby selling case अशावेळी पैसे मोजून आणलेल्या बाळाप्रतीचा जिव्हाळा, प्रेम आटू लागल्यास अशा लेकरांची आयुष्यभराची होणारी हेळसांड मानवतेच्या सर्व सीमा पार करणारीच असेल! डॉक्टर म्हणून त्यांनी मांडलेला लेकरांचा बाजार नक्कीच, त्यांच्या नैतिक अधःपतनाचे लक्षण आहे, पण माणूस म्हणून आपल्याला परमेश्वराने दिलेल्या वैचारीक क्षमतेचा वापर करुन अशा बाजारांमध्ये आपण खरेदीसाठी जायचे की नाही, याचा विचार आपल्यालाच करायचा आहे. नाहीतर आज एक बाळ विकल्या गेलं, उद्या हा आकडा वाढेल आणि आपण केवळ हे किती चूकीचे आहे, यावरच चर्चा करत राहू!
विजय निचकवडे
मो.9763713417
...