ओटावा,
Batsman Navneet Dhaliwal retires फलंदाज नवनीत धालीवाल२०२६ मधील आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान कॅनडाच्या संघाचा प्रवास थांबल्यानंतर अनुभवी फलंदाज नवनीत धालीवाल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३७ वर्षीय या खेळाडूने स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच हा विश्वचषक आपला अखेरचा ठरेल, असे मनोमन ठरवले होते. अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नई येथे होणारा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर कॅनडाच्या पुढील फेरीत जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या. त्या सामन्यात धालीवाल यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर त्यांनी निवृत्तीबाबतची घोषणा करत आपल्या दीर्घ प्रवासाची सांगता होत असल्याचे सांगितले.
चंदीगड येथे १९८८ साली जन्मलेले धालीवाल काही वर्षांपूर्वी कॅनडात स्थायिक झाले आणि तेथेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्वप्नाला आकार मिळाला. २०१५ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले आणि लवकरच संघातील प्रमुख फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली. कॅनडासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांत त्यांनी सातत्याने प्रभावी कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले.
संघाचे नेतृत्व करताना त्यांनी महत्त्वाचे विजय मिळवून दिले आणि २०२४ मधील विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यातही मोठा वाटा उचलला. त्या स्पर्धेतील त्यांच्या धडाकेबाज अर्धशतकाची आठवण चाहत्यांच्या मनात कायम राहील. खेळातून निवृत्त झाल्यानंतर तळागाळातील क्रिकेट विकासासाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करून कॅनडामध्ये क्रिकेटची भक्कम पायाभरणी करण्याचा त्यांचा मानस आहे. धालीवाल यांच्या निवृत्तीमुळे कॅनडाच्या क्रिकेटमधील एक महत्त्वाचा अध्याय संपला असला, तरी नव्या पिढीसाठी प्रेरणेचा दीप त्यांनी प्रज्वलित करून ठेवला आहे.