नवी दिल्ली,
Controversy in Pakistan's dressing room वीस षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडून ६१ धावांनी झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघात अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. कोलंबो येथील सिंहली क्रीडा क्लब मैदानावर नामिबियाविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यापूर्वीच संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये मतभेद उफाळल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पराभवानंतर वरिष्ठ खेळाडूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून संघरचनेत मोठे बदल होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.
संघातील प्रमुख फलंदाज बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि अष्टपैलू शादाब खान यांच्या कामगिरीवरूनच चर्चेचे केंद्र फिरत असल्याचे सांगितले जाते. सराव सत्रादरम्यान कर्णधार सलमान अली आगा आणि मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांच्यात दीर्घ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अनुभवी खेळाडूंच्या सातत्यहीन कामगिरीमुळे त्यांना विश्रांती देण्याचा पर्याय व्यवस्थापन विचारात घेत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संघात दोन गट पडल्याच्या चर्चा अधिकच रंगल्या असून काही खेळाडू कर्णधाराच्या भूमिकेला पाठिंबा देताना दिसत आहेत. सलग पराभवांमुळे संघातील वातावरण तणावपूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. जर मोठी नावे संघाबाहेर ठेवली गेली, तर त्याचा मानसिकतेवर कसा परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गट अ मधील गुणतालिकेत पाकिस्तानने तीनपैकी दोन सामने जिंकले असले तरी पुढील सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. भारत आधीच पुढील फेरीत दाखल झाला असून दुसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. नामिबियाविरुद्ध पराभव झाल्यास पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे हा सामना त्यांच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.