ना सरपंच, ना प्रशासक; देवरीतील 29 ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प

18 Feb 2026 18:00:25
मुल्ला,
Deori Panchayat issue देवरी पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या 29 गट ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने सध्या गावपातळीवरील प्रशासन अक्षरशः ठप्प झाले आहे. सरपंचांसह सर्व पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ग्रामपंचायतींवर लोकप्रतिनिधींचे अस्तित्व उरलेले नाही. त्यातच प्रशासक नेमण्याच्या शासन आदेशाला न्यायालयीन स्थगिती मिळाल्याने ‘ना सरपंच, ना प्रशासक’ अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावरच सर्व कामकाजाची जबाबदारी येऊन पडली आहे. मात्र एकट्या अधिकार्‍याने आर्थिक व्यवहार, विकासकामे, नागरिकांच्या तक्रारी, दैनंदिन प्रशासन असा सर्व कारभार सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावगाडा कसा चालवायचा? असा प्रश्न निर्माण झाला असून विकासकामातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
 

Deori Panchayat issue 
 
राज्य शासनाने 23 जानेवारी 2026 रोजी परिपत्रक काढून जानेवारी 2025 ते डिसेंबर 2026 दरम्यान कार्यकाळ संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे निर्देश दिले होते. मात्र या आदेशाविरोधात काही नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिल्याने सध्या प्रशासकीय शून्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींतील निधीवाटप, मंजुरी प्रक्रिया, विकासकामांचे प्रस्ताव आणि विविध शासकीय योजना यावरही याचा परिणाम होत असून आर्थिक व्यवहारात अडथळे येत आहेत. नागरिकांच्या मूलभूत सेवांवरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्य शासन व निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा किंवा पर्यायी व्यवस्था स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. अन्यथा गावपातळीवरील प्रशासन अधिकच विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देवरी पंचायत समितीतील 29 ग्रामपंचायतींच्या मागील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर काही ग्रामपंचायतींनी 11 फेब्रुवारी तर काहींनी 12 फेब्रुवारी 2021 रोजी पदभार स्वीकारला होता. पंचवार्षिक कार्यकाळानुसार 12 फेब्रुवारी 2026 पूर्वी निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने प्रशासक नेमला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पिंडकेपार/गो., सुरतोली, देवाटोला, वडेगाव, शिलापूर, कडीकसा, ईस्तारी, लोहारा, मिसपीरी, सावली, मुरदोली, गोटाबोडी, उचेपूर, कोटजांभोरा, सर्रेगाव, परसोडी, पिंडकेपार/चि., फुटाना, बोरगाव/बा., कन्हाळगाव, भर्रेगाव, शेरपार, शिरपूर/बांध, मुरमाडी, पालांदूर/जमी., मेहताखेडा, चिपोटा, ककोडी, चिल्हाटी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0