पंचतत्वांच्या साक्षीने गोंदियाची झेप

18 Feb 2026 17:47:53
गोंदिया,
My Vasundhara campaign 5.0 पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरी करत गोंदिया जिल्हा परिषदेला ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ अंतर्गत तब्बल आठ मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सहा आणि वैयक्तिक कार्यासाठी दोन असे आठ पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्याचा नावलौकिक राज्यभर उजळला आहे. महाराष्ट्र शासनाने मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी परिपत्रकाद्वारे पुरस्कारांची घोषणा केली. 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात राज्यातील 27 हजार 895 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आली होती.
 

My Vasundhara campaign 5.0  
डेस्कटॉप व फिल्ड मूल्यांकनाच्या आधारे त्रयस्थ संस्थेमार्फत गुणांकन करण्यात आले. तीन ते पाच हजार लोकसंख्या गटात ग्रामपंचायत डव्वाने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला. डव्वाला 75 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘भूमी’ थीमॅटिकमधील उच्चतम कामगिरीसाठी अतिरिक्त 50 लाख रुपये मिळणार आहेत. दीड हजार ते दोन हजार लोकसंख्या गटात ग्रामपंचायत भजेपारने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवित 75 लाख रुपयांचा पुरस्कार मिळविला आहे. ‘भूमी’ थीमॅटिकमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी या ग्रामपंचायतीलाही 50 लाख रुपयांचा अतिरिक्त पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध गटात मिळालेले हे चार पुरस्कार जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहेत. दोन ते तीन हजार लोकसंख्या गटात सालेकसा पंचायत समिती अंतर्गत नानव्हा ग्रामपंचायतीने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक मिळवित 50 लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला आहे. दीड हजार ते दोन हजार लोकसंख्या गटात अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत सिरेगाव ग्रामपंचायतीनेही विभागातून प्रथम येत 50 लाख रुपयांचा पुरस्कार मिळविला आहे. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या ग्रामपंचायतींना एकूण सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विभागस्तरीय उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांना ‘सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. सालेकसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पुरी यांनाही जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. सीईओ मुरूगानंथम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी सर्व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे अभिनंदन करून आगामी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानातही अशीच कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे.
बदलाची नवी दिशा
मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर मुरूगानंथम यांनी जिल्हा परिषदेत ई-ऑफिस प्रणाली सुरू करून कारभारात पारदर्शकता आणली. प्रलंबित शिक्षक पदोन्नती व अनुकंपा भरती प्रक्रिया मार्गी लावली. न्यायालयीन प्रकरणे निकाली काढत प्रशासन गतिमान केले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, ‘मामा तलाव’ पुनरुज्जीवन, घरकुल लाभार्थ्यांच्या गृहभेटी, ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता अभियान आणि नियमित दप्तर तपासणी अशा उपक्रमांमुळे जिल्ह्यात प्रशासनाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0