नवी दिल्ली,
Ishan Kishan's talk in Pakistan भारताने वीस षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवत संस्मरणीय कामगिरी केली आणि या सामन्याचा खरा शिल्पकार ठरला तो युवा फलंदाज इशान किशन. पाटण्याचा हा डावखुरा फलंदाज ४० चेंडूत ७७ धावा काढत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याच्या खेळीत दहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. सुरुवातीला सावध खेळल्यानंतर त्याने आक्रमक रूप धारण केले आणि सामन्याचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवले. या विजयाची गणना स्पर्धेतील मोठ्या विजयांपैकी एक म्हणून केली जात आहे.
या दमदार खेळीनंतर इशानची चर्चा सीमापारही रंगली. पाकिस्तानमध्ये त्याच्या नावाचे शोध मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले. त्याची उंची किती, वय किती, कुटुंब कोणते, त्याचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे अशा विविध प्रश्नांची उत्सुकता तिथल्या चाहत्यांमध्ये दिसून आली. त्याची उंची सुमारे पाच फूट सहा इंच असल्याचे सांगितले जाते. काही वृत्तांनुसार त्याचे नाव मॉडेल अदिती हुंडिया हिच्याशी जोडले गेले असले तरी दोघांकडूनही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने ही इशानचे कौतुक करत त्याला सामन्याचा नायक म्हटले. इतर फलंदाज अडचणीत असताना त्याने संघाला सावरले, असे मत त्याने व्यक्त केले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत तो राष्ट्रीय संघाच्या आराखड्यात नव्हता; मात्र या खेळीमुळे त्याचे पुनरागमन ठळकपणे अधोरेखित झाले.
संघाबाहेर राहिलेल्या काळात मानसिक तणावाचा सामना करताना इशानने आध्यात्मिक मार्गाचा आधार घेतला. तो आपल्या पिशवीत भगवद्गीतेची छोटी प्रत ठेवत असे आणि नियमित वाचन करत असे, असे सांगितले जाते. आईच्या सल्ल्यामुळे त्याला मानसिक स्थैर्य मिळाले आणि आत्मविश्वास वाढला. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली झारखंडने देशांतर्गत वीस षटकांची स्पर्धा जिंकली, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वगुणांचीही चर्चा झाली. लहान वयातच पाटण्यात क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या इशानने शिक्षणापेक्षा खेळाला प्राधान्य दिले. यष्टिरक्षण आणि आक्रमक फलंदाजी ही त्याची खास ओळख बनली आहे. आता या दमदार कामगिरीमुळे तो केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे.