मुंबई
Migratory birds decline, विदर्भातील जलाशयांवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी दूरवरचा प्रवास करून हजेरी लावतात, मात्र यंदा त्यांचा आगमन अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरू होणारे या पक्ष्यांचे स्थलांतर यंदा उशिरा सुरू झाले असून, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसही अनेक प्रजाती जलाशयांवर दिसत नाहीत.
अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील जलाशयांचे दरवर्षी स्थलांतरीत पक्षी निरीक्षक, अभ्यासक, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी उत्सुकतेने प्रतिक्षा करतात. मात्र यंदा स्थलांतरासाठी फक्त बोटांवर मोजता येतील अशा प्रजातींची हजेरी आढळली आहे. अकोला जिल्ह्यातील पोपटखेड, काटेपूर्णा, दगडपारवा, कापशी, सिसा-मासा-उडेगाव, विझोरा, दुधाळा, आगर, आखतवाडा यासारख्या जलाशयांवर केवळ पेन्टेट स्टॉर्क, रेड क्रिस्टेड पोचार्ड, लेसर विसलिंग, कॉम्ब डक, ब्राम्हणी आणि स्पॉटबिल यासारख्या काही प्रजातींचे दर्शन घडले आहे. पूर्वी या पाणथळांवर फ्लेमिंगो, कॉमन क्रेन, ग्रे हेडेड लॅपविंग, नॉदर्न शॉवलर, गडवाल, कॉमन पोचार्ड, बार हेडेड गूज यासारख्या प्रजातीही पाहायला मिळत होत्या.पक्षीतज्ञांच्या मते, यंदाची परिस्थिती फक्त अकोलापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण विदर्भातील जलाशयांमध्ये अशीच दिसत आहे. त्याचे मुख्य कारण हवामान बदल, पक्षी अधिवासातील बदल आणि जलाशय परिसरातील वाढता मानवी हस्तक्षेप हे आहेत. शहराजवळील पाणथळ स्थळी प्लास्टिकचा अवाजवी वापर, कुत्र्यांचा वाढता हैदोस, प्रदूषण आणि मानवी हालचाली यामुळे पक्ष्यांसाठी ह्या जलाशयांचा पर्यावरणीय दर्जा कमी झाला आहे.
महाराष्ट्र पक्षीमित्र Migratory birds decline, संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी याबाबत सांगितले की, “भविष्यात या पाणथळांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. वाढते प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेप यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांचा या जलाशयांकडे येण्याचा कल कमी झाला आहे. जर योग्य उपाययोजना केली नाही, तर भविष्यात या प्रजातींचा विलुप्तिचा धोका निर्माण होऊ शकतो.”तज्ज्ञांचे मत आहे की, थंडी कमी पडणे आणि स्थलांतराचा कालावधी अजून सुरू असला तरी, पक्ष्यांच्या संख्येत अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे जलाशयांचे संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण यावर अधिक भर देणे आवश्यक ठरत आहे.विदर्भातील निसर्गप्रेमींना या वर्षी काही प्रजातींचे दर्शन जरी कमी मिळाले तरी, पाणथळ स्थळी स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची आवड कायम आहे, आणि येणाऱ्या काही आठवड्यांत त्यांच्या संख्येत वाढ होईल अशी आशा तज्ज्ञ व्यक्त करतात.